आर्थिक विकासासाठी देशांतर्गत शांतता महत्वाची - मनमोहन सिंग
By admin | Published: November 6, 2015 05:47 PM2015-11-06T17:47:02+5:302015-11-06T18:54:45+5:30
देशाची आर्थिक वाढ व विकासासाठी देशातील शांतता टिकून राहणे अत्यंत महत्वाचे असल्याचे मनमोहन सिंग यांनी नमूद केले
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ६ - देशाची आर्थिक वाढ आणि विकासासाठी देशातील शांतता टिकून राहणे अत्यंत महत्वाचे असल्याचे सांगत राष्ट्रीय एकात्मता, विविधता आणि धर्मनिरपेक्षता हे आपल्या देशाचे वैशिष्ट्य असल्याचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नमूद केले. वैचारिक मतभिन्नता मांडण्याच्या हक्कांवर गदा आणणे, विचारवंतांवर हल्ला करणे या कृती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारल्या जाणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. वेगळा विचार मांडणारा आवाज दाबून टाकणे हा एक प्रकारे लोकशाही तत्त्वांवर होणारा हल्लाच असून देशाच्या आर्थिक विकासासाठी ही बाब घातक आहे. देशातील सर्वच विचार करणाऱ्या लोकांनी या कृतीचा कठोर शब्दांत विरोध केला, असे ते म्हणाले.
देशातील वाढत्या असहिष्णूतेच्या मुद्यावरून सध्या बराच वाद सुरू असून त्या निषेधार्थ अनेक कलावंत, लेखक, दिग्दर्शक, वैज्ञानिकांनी आपले पुरस्कार परत केले आहेत. या घटनांच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका मांडताना मनमोहन सिंग यांनी सरकारला खडे बोल सुनावले. विचारवंतांवर हल्ला करणे, दुसरी बाजू मांडणा-यांचा आवाज दडपणे या कृती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नसून ते एक प्रकारे लोकशाही तत्त्वांनाच तिलांजली देण्यासारखे आहे, असे सिंग यांनी म्हटले.