"दबदबा है और दबदबा रहेगा", ब्रिजभूषण सिंह यांच्या मुलाने झळकावले पोस्टर!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 05:32 PM2023-12-21T17:32:26+5:302023-12-21T17:41:26+5:30
माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांनीही संजय कुमार सिंह यांच्या विजयाबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघ म्हणजेच WFI च्या निवडणुकीत संजय कुमार सिंह यांची नवीन अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. संजय कुमार सिंह यांच्या विजयानंतर त्यांची माजी WFI अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांनी भेट घेतली. संजय कुमार सिंह हे ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय असल्याचे म्हटले जाते.
माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांनीही संजय कुमार सिंह यांच्या विजयाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. भारतीय कुस्तीवरील ग्रहण लवकरच संपणार असल्याचे ब्रिजभूषण शरण सिंह यांनी म्हटले आहे. "हा माझा वैयक्तिक विजय नसून देशातील कुस्तीपटूंचा विजय आहे. मला आशा आहे की नवीन महासंघाच्या स्थापनेनंतर कुस्ती स्पर्धा पुन्हा सुरू होतील. 11 महिने कुस्तीवर लागलेले ग्रहण आता दूर होणार आहे", असे ब्रिजभूषण शरण सिंह म्हणाले.
दरम्यान, ब्रिजभूषण शरण सिंह यांचे सहकारी संजय कुमार सिंह यांचा विजय हा त्या कुस्तीपटूंसाठी मोठा धक्का मानला जात आहे, ज्यांनी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. मात्र, संजय कुमार सिंह यांच्या विजयानंतरही कुस्ती संघटनेतील ब्रिजभूषण शरण सिंह यांचा दबदबा कायम असल्याचे म्हटले जात आहे. दुसरीकडे, ब्रिजभूषण शरण सिंह यांचा मुलगा प्रतीक भूषण सिंह यानेही वडिलांच्या समर्थनार्थ पोस्टर झळकावले आहे. पोस्टरवर लिहिले आहे - "दबदबा तो है-दबदबा तो रहेगा, यह तो भगवान ने दे रखा है."
संजय कुमार सिंह यांना 40 मते मिळाली
संजय कुमार सिंह यांनी प्रतिस्पर्धी अनिता शेओरान यांचा पराभव केला आहे. ब्रिजभूषण शरण सिंह यांनी यापूर्वीच दावा केला होता की, संजय सिंह कुस्ती संघटनेचे अध्यक्ष होतील. दरम्यान, भारतीय कुस्ती संघटनेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत संजय कुमार सिंह यांच्या पॅनलचे बहुतांश उमेदवार विजयी झाले आहेत. निवडणुकीत संजय कुमार सिंह यांना 40 तर, अनिता शेओरान यांना फक्त 7 मते मिळाली. मात्र अनित शेओरान यांच्या पॅनलने सरचिटणीसपदी बाजी मारली आहे. प्रेमचंद लोचब यांनी दर्शन लाल यांचा पराभव केला आहे.
कुस्तीपटूंनी व्यक्त केली नाराजी
ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटू साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांनी संजय कुमार सिंह यांची भारतीय कुस्ती संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केले आहे. आम्ही 40 दिवस रस्त्यावर झोपलो आणि देशाच्या अनेक भागातून बरेच लोक आम्हाला पाठिंबा देण्यासाठी आले. ब्रिजभूषण शरण सिंह यांचा व्यावसायिक भागीदार आणि जवळचा सहकारी भारतीय कुस्ती संघटनेच्या अध्यक्षपदी निवडून आले आहेत. त्यामुळे मी कुस्ती सोडून देईन, असे साक्षी मलिक हिने म्हटले आहे. तर विनेश फोगट म्हणाली की, अपेक्षा खूप कमी आहेत पण आम्हाला न्याय मिळेल अशी आशा आहे. कुस्तीचे भवितव्य अंधारात आहे हे खेदजनक आहे. आपले दु:ख कोणाकडे मांडायचे?