डोनाल्ड ट्रम्पही आहेत पंतप्रधान मोदींचे चांगले मित्र
By admin | Published: November 15, 2016 12:08 PM2016-11-15T12:08:10+5:302016-11-15T12:08:10+5:30
अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नमूद केले.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १५ - अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी माझे चांगले संबंध असून त्यांचा कल भारताच्या बाजूने राहील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला. ट्रम्प यांच्यासोबत काम करण्यास आपण उत्सुक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सोमवारी राजधानी दिल्लीत पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएच्या घटक पक्षांची बैठक झाली त्यानंतर मोदींनी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्यासह भाजपच्या प्रमुख नेत्यांसोबत भोजन केले. सुमारे एक ते सव्वा तास चाललेल्या या भोजन समारंभात महत्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली. त्याचदरम्यान उपस्थितांपैकी एका व्यक्तीने मोदींना अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ट्रम्प यांच्याशी संबंध कसे वाढवणार, असा प्रश्न विचारला असता मोदींनी ट्रम्प व अमेरिकेसोबतच्या संबंधावर भाष्य केले.
' आपले ट्रम्प यांच्याशी चांगले सख्य असल्याचे ' मोदींनी नमूद केले. तसेच ' (अमेरिकेतील सत्ताबदलानंतर) दोन्ही देशांतील परस्पर संबंधांमध्ये कोणताही मोठा बदल होणार नसल्याचेही' ते म्हणाले. यावेळी डेमोक्रॅटस व रिपब्लिकन सत्ताधाऱ्यांनी भारत व पंतप्रधानांना दिलेली वागणूक, त्यांचा भारताविषयीचा दृष्टीकोन, माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांचे कुणाबरोबर चांगले संबंध होते, अशा अनेक मुद्यांवरही चर्चा झाली. अखेर, रिपब्लिकन राजवट भारतासाठी अधिक फायद्याची असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. दरम्यान १९९०च्या दशकाच्या प्रारंभीच्या काळातील भारत- अमेरिकेदरम्यान खडतर संबंधांचाही उल्लेख या चर्चेदरम्यान झाला. त्यावेळी 'अमेरिकेचे राजदूत रॉबिन राफेल यांनी जम्मू-काश्मीरचा उल्लेख "वादग्रस्त भूभाग" असा केल्यानंतर वाद निर्माण झाला होता' या मुद्यावरही बैठकीदरम्यान चर्चा झाली.