Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांच्याभोवती सुरक्षेचं कवच; युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 12:32 PM2020-02-24T12:32:09+5:302020-02-24T12:46:13+5:30
Donald Trump India Visit: २०१८ मध्ये उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंगने ट्रम्प यांना धमकी दिली होती की त्यांच्याकडे न्यूक्लियर बॉम्बचं बटण आहे.
नवी दिल्ली - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आहे. यावेळी ते अहमदाबाद आणि आग्रा येथील ताजमहल येथे भेट देणार आहेत. जगातील सर्वाधिक शक्तिशाली देशाचे राष्ट्राध्यक्ष असल्याने त्यांची सिक्युरिटीला विशेष महत्त्व आहे. भारत दौऱ्यावर असल्याने ट्रम्प यांना थ्री लेयर हाय सिक्युरिटी देण्यात आली आहे.
पहिल्या टप्प्यात अमेरिकेची सीक्रेट एजेंन्सी, त्यानंतर एसपीजी आणि अहमदाबाद क्राईम ब्रांच डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी तैनात असणार आहे. अमेरिकेच्या न्यूज वेबपोर्टलनुसार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोणत्याही दौऱ्यावर असले तर तीन महिने आधी त्यांची सुरक्षा टीम त्याठिकाणी पोहचते. स्थानिक पोलिसांच्या मदतीने सुरक्षेची खबरदारी घेतली जाते. राष्ट्राध्यक्ष येण्यापूर्वी एअरस्पेस क्लीअर केली जाते. एअरफोर्स वनने डोनाल्ड ट्रम्प भारतात आले आहेत. याला जगातील सर्वात सुरक्षित विमान मानलं जातं. हे विमान राष्ट्रपती ऑफिससारखं असतं. या विमानात एखाद्या ऑफिसप्रमाणेच सर्व सुविधा असते.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्यापूर्वी कशी होते तयारी?
राष्ट्राध्यक्षांच्या दौऱ्यापूर्वी कमीत कमी ३ महिने आधी यूएस सीक्रेट सर्व्हिस त्याठिकाणी पोहचते. स्थानिक पोलीस, सुरक्षा यंत्रणा यांच्या सहाय्याने राष्ट्राध्यक्षांच्या दौऱ्याची तयारी केली जाते. वाहतुकीचा मार्ग, सर्वात जवळचं ट्रॉमा सेंटर याचीही माहिती घेतली जाते. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी सुरक्षित स्थळाची पाहणी केली जाते. ज्या लोकांपासून राष्ट्राध्यक्षाला धोका आहे अशा लोकांवर करडी नजर ठेवली जाते. दौऱ्याच्या काही दिवस अगोदर स्नीफर डॉग्स आणले जातात. त्यांच्या मदतीने राष्ट्राध्यक्षांच्या वाहतूक मार्गाची तपासणी केली जाते. तसेच या मार्गावर कोणत्याही वाहनांना पार्किंग करण्यावर बंदी आणली जाते.
डोनाल्ड ट्रम्प यांचं विमान कसं आहे?
जवळपास ४ हजार स्क्वेअर फूट जागा विमानात असते. यात राष्ट्राध्यक्षांसाठी विशेष रुम असते. वैद्यकीय सुविधा असते. कॉन्फरन्स रुम, डायनिंग रुम आणि जीमदेखील असते. या विमानात दोन किचन असतात. ज्यात एकाच वेळी १०० लोकांसाठी जेवण बनवू शकतो. त्याचसोबत यामध्ये प्रेस रुम, सिक्युरिटी स्टाफ, ऑफिस स्टाफ आणि व्हिआयपी लोकांसाठी रुम असते.
२०१८ मध्ये उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंगने ट्रम्प यांना धमकी दिली होती की त्यांच्याकडे न्यूक्लियर बॉम्बचं बटण आहे. त्याला उत्तर देताना डोनाल्ड ट्रम्प यांनीही माझ्याकडेही शक्तिशाली बटण आहे. वॉश्गिंटन पोस्टनुसार राष्ट्राध्यक्षांसोबत एक लेदर बॅग घेऊन सैन्याचा अधिकारी असतो. या बॅगेत न्यूक्लियर हत्याराचा वापर आणि त्याचं लॉन्चिंग करण्याचा कोड असतो. या बॅगेला फुटबॉल बोललं जातं. हा यूनिक कोड नेहमी राष्ट्राध्यक्षांसोबत असतो. जर कुठेही आपत्कालीन आणि युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर राष्ट्राध्यक्ष कोणत्याही ठिकाणावरुन न्यूक्लियर हत्यार लॉन्चिंग करण्याचे आदेश देऊ शकतात.
ट्रम्प यांच्या भेटीपूर्वी त्यांची कार "द बीस्ट" अमेरिकन एअर फोर्स सी -१७ ग्लोबमास्टर ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्टमधून भारतात आली आहे. या कारची निर्मिती अमेरिकन कंपनी जनरल मोटर्सने केली आहे. ट्रम्पची कार जगातील सर्वात सुरक्षित कार मानली जाते. अणू हल्ला आणि रासायनिक हल्ल्यामुळेही याचा परिणाम होत नाही. या कारचे वजन 20 हजार पौंड म्हणजेच सुमारे 10 हजार किलो आहे. त्याची किंमत सुमारे 10 कोटी रुपये आहे.
कारमध्ये मशीन गन, टायर्ड गॅस सिस्टम, फायर फाइटिंग आणि नाईट व्हिजन कॅमेरे अशी उपकरणे आहेत. गरज भासल्यास शत्रूवरही या कारने हल्ला केला जाऊ शकतो. कारची टायर रिम मजबूत स्टीलची बनलेली आहे. याचा अर्थ असा की टायर पंक्चर झाला तरी कारच्या गतीवर परिणाम होणार नाही. या गाडीत जे पेट्रोल टाकण्यात आले आहे, त्यात खास फोम मिसळले आहे, जेणेकरून कोणताही स्फोट होणार नाही.
कारचे गेट 8 इंच जाड असून त्याची विंडो बुलेट प्रूफ आहे. कारची फक्त एक विंडो उघडते जी ड्रायव्हर सीटच्या बाजूला आहे. ड्रायव्हरची केबिन आणि ट्रम्प यांच्या केबिनमध्ये काचेची भिंतदेखील आहे जेणेकरुन ट्रम्प यांची गुप्त बैठक आणि चर्चा गुप्त असू शकेल. ट्रम्प यांच्याकडे एक उपग्रह फोन असतो ज्याच्या मदतीने ते कोणत्याही वेळी कोणाशीही बोलू शकतात. गाडीच्या डिग्गीमध्ये ट्रम्पच्या रक्त प्रकाराचे रक्तही ठेवले जाते.
महत्त्वाच्या बातम्या
वेलकम टू इंडिया... डोनाल्ड ट्रम्प यांना मोदींची 'जादू की झप्पी'
डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्यावर १०० कोटी वाया गेले नाहीत; 'असा' आहे भारताचा जागतिक प्लॅन
ट्रम्प यांचं फाईव्ह स्टार हॉटेलपेक्षाही भारी विमान, याच्या भन्नाट गोष्टी वाचून व्हाल हैराण!
मोदी सरकार असेपर्यंत समाधान नाही, काश्मीरबाबत इम्रान खान हतबल
...तर डोनाल्ड ट्रम्प कुटुंबाने रांगेत उभं राहून शिवथाळीची चव चाखली असती!