डोनाल्ड ट्रम्प इफेक्ट: हाफीजच्या संघटनेवर बंदी
By Admin | Published: July 1, 2017 01:15 AM2017-07-01T01:15:45+5:302017-07-01T01:15:45+5:30
मुंबईवरील २६/११च्या भयंकर दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईदच्या ‘तेहरिक-ए-आझादी-जम्मू-काश्मीर’ या संघटनेवर पाकिस्तानने बंदी घातली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : मुंबईवरील २६/११च्या भयंकर दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईदच्या ‘तेहरिक-ए-आझादी-जम्मू-काश्मीर’ या संघटनेवर पाकिस्तानने बंदी घातली आहे. अमेरिकेने अलीकडेच दहशतवादाच्या मुद्द्यावरून पाकिस्तानला सज्जड इशारा देत पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांची पाळेमुळे उद्ध्वस्त करण्याचे, आर्थिक मदत रोखण्याचे तसेच बिगर नाटो मित्र राष्ट्राचा दर्जा रद्द करण्याचेही संकेत दिले होते. त्यामुळे धास्तावलेल्या पाकिस्तानला अखेर हाफीज सईदच्या या संघटनेवर बंदी घालणे भाग पडले. हाफीज सईदला पाकिस्तानने ३० जानेवारीपासून नजरकैद केले आहे.
अमेरिकेने २००१मध्ये लष्कर-ए-तैयबाला दहशतवादी संघटना घोषित केल्यानंतर पाकिस्तानने २००२मध्ये लष्कर-ए-तैयबावर बंदी घातली होती. त्यानंतर हाफीज सईदने जमात-उद-दावा ही संघटना स्थापन करून भारतविरोधी कारवाया चालू ठेवल्या. या संघटनेवर पाकिस्तान नजर ठेवून असल्याने त्याने ‘तेहरिक-ए-आझादी-जम्मू-काश्मीर’ ही संघटना स्थापन करून दहशतवादी कारवाया सुरू ठेवल्या.
पाकिस्तानच्या दहशतवादीविरोधी राष्ट्रीय प्राधिकरणाच्या वेबसाईटनुसार, जमात-उद-दावा या संघटनेचा पाकिस्तानने बंदी असलेल्या संघटनांच्या यादीत समावेश करून या संघटनेवर नजर ठेवून आहे.
१० दिवसांपूर्वी ट्रम्प प्रशासनाने पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर ड्रोनने हल्ला करण्याचे संकेत दिले होते. बंदी असलेल्या संघटनेच्या यादीत जैश-ए-मोहम्मद, अल-कायदा, तेहरीक-ए-तालिबान आणि बलुचिस्तान लिबरेशन आर्मीसह ६४ संघटनांचा समावेश आहे.
भारताने उपस्थित केला होता मुद्दा-
भारताने ‘तेहरीक-ए-आझादी-जम्मू-काश्मीर’ या संघटनेच्या दहशतवादी कारवायांकडे आंतरराष्ट्रीय दहशतवाद वित्तीय कृती दलाचे लक्ष वेधत या संघटनेवर
बंदी घालण्याची मागणी
केली होती. भारताच्या मागणीनुसार पहिल्यादांच पाकिस्तानने या संघटनेवर बंदी घातली आहे.
दहशतवादाच्या दृष्टीने
अत्यंत जोखमीच्या आणि सहकार्य न करणाऱ्या क्षेत्राबाबत इंटर-गव्हर्मेन्टल फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स पुढच्या महिन्यात फेरआढावा घेणार आहे.
त्याआधीच पाकिस्तानने हे
पाऊल उचलत दहशतवादाच्या मुद्द्यावर सहकार्य करीत
असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते.
मनी लाँड्रिंग, दहशतवाद्यांचे आर्थिक पाठबळ आणि अन्य संभाव्य धोक्यांना पायबंद करण्यासाठी कायदेशीर, नियंत्रण आणि कार्यवाहीत्मक उपायांच्या अंमलबजावणीसाठी या अॅक्शन टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे.