डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 09:33 AM2024-11-27T09:33:29+5:302024-11-27T09:35:34+5:30
Donald Trump Jay Bhattacharya: अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाचे जय भट्टाचार्य यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.
Donald Trump Jay Bhattacharya News: अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेत घरवापसी करताच भारतीय वंशाच्या लोकांनाही सरकारमध्ये सहभागी करून घेतले आहे. ट्रम्प यांनी भारतीय वंशाचे डॉ. जय भट्टाचार्य यांना नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ डायरेक्टर पदी नियुक्ती केली आहे. ट्रम्प वॉर रुप या सोशल मीडिया हॅण्डलवरून याबद्दल माहिती दिली. ही पोस्ट जय भट्टाचार्य यांनी रिट्विट केली आहे.
डॉ. जय भट्टाचार्य यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ डायरेक्टरपदी नियुक्ती केल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माझी नियुक्ती केल्याबद्दल अभिमानास्पद वाटत आहे. आम्ही अमेरिकेतील वैज्ञानिक संस्थांमध्ये सुधारणा करू. जेणेकरून लोकांमध्ये त्यांच्याबद्दल पुन्हा विश्वास निर्माण होईल. अमेरिकेला पुन्हा स्वस्थ बनवण्यासाठी चांगले वैज्ञानिक संशोधन करू, असेही भट्टाचार्य यांनी म्हटले आहे.
डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले आहेत?
भारतीय वंशाच्या जय भट्टाचार्य यांची नियुक्ती करताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, एनआयएचच्या संचालकपदी जय भट्टाचार्य यांची नियुक्त करताना मला आनंद होत आहे. ते देशाच्या आरोग्य संस्था आणि महत्त्वाच्या संशोधनात रॉबर्ट एफ. केनेडी ज्युनिअर यांच्यासोबत मिळून काम करतील. त्यामुळे आरोग्य क्षेत्रात सुधारणा येतील आणि लोकांची सुरक्षा केली जाईल असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
ट्रम्प यांनी म्हटले आहे की, जय भट्टाचार्य हे स्टॅनफोर्ड विद्यापीठात आरोग्य धोरण विषयाचे प्राध्यापक आहेत. नॅशनल ब्युरो ऑफ इकॉनॉमिक्स रिसर्चमध्ये रिसर्चर असोसिएट आहेत. स्टॅनफोर्ड इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक पॉलिसी रिसर्च, स्टॅनफोर्ड फ्रीमॅन स्पोगली इन्स्टिट्यूट आणि ह्युवर इन्स्टिट्यूटमध्ये वरिष्ठ संशोधक आहेत.
जय भट्टाचार्य यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात एमडी आणि पीएचडी केलेली आहे.