मोदींना मोठा धक्का; ट्रम्प यांचा भारतात येण्यास नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2018 09:00 AM2018-10-28T09:00:07+5:302018-10-28T09:01:13+5:30
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रजासत्ताक दिनावेळी मुख्य अतिथी म्हणून हजर राहण्यास सपशेल नकार कऴविल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मोठा धक्का बसला आहे.
नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रजासत्ताक दिनावेळी मुख्य अतिथी म्हणून हजर राहण्यास सपशेल नकार कऴविल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मोठा धक्का बसला आहे. भारताने रशियाकडून शस्त्रास्त्र खरेदी आणि इराणकडून तेलाची आयात केल्याने ट्रम्प नाराज आहेत. यामुळे अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी नुकतेच भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना ट्रम्प भारतात येणार नसल्याचे पत्र दिले आहे.
अमेरिकेमध्ये काही राजकीय कार्यक्रम आणि स्टेट ऑफ यूनियनला ट्रम्प संबोधित करणार असल्याचे कारण देत ट्रम्प यांनी या पत्रामध्ये खेद व्यक्त केला आहे. मात्र, अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा हे 2015 मध्ये प्रजासत्ताक दिनावेळी सर्व कार्यक्रम, जबाबदाऱ्या बाजुला ठेवून मुख्य अतिथी म्हणून भारतात आले होते. ट्रम्प यांनी मोदींचे हे निमंत्रण अशावेळी नाकारले आहे, जेव्हा इराणकडून तेल खरेदी सुरुच ठेवल्याने भारत आणि अमेरिकेमधील संबंध ताणले गेले आहेत. तसेच गेल्या आठवड्यात रशियाकडून केलेली शस्त्रास्त्र खरेदीही याला कारण मानले जात आहे.
भारताने रशियाकडून एस-400 एअर डिफेंस मिसाईल सिस्टिम नुकतीच खरेदी केली होती. यावर अमेरिकेने नाराजी व्यक्त केली होती. तसेच अमेरिकेची एफ-16 विमाने खरेदी करण्यासही भारताला बजावले होते. रशियाच्या राजदुतांनी भारताच्या स्वतंत्र देशाच्या भुमिकेवर स्तुतीसुमने उधळली होती. तसेच इराणकडून तेल खरेदीमध्ये कमी करण्यासही भारताने नकार दिला होता. यामुळे ट्रम्प भारतावर नाराज आहेत.
पुढील वर्षी लोकसभा निवडणूक होणार आहे. यापूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष भारतात आल्यास त्याचा फायदा सत्ताधारी भाजपला पर्यायाने मोदींना होणार होता. गेल्या काही महिन्यांपासून ट्रम्प मुख्य अतिथी म्हणून भारतात येणार याबाबतची वृत्ते येत होती. मात्र, अमेरिकेच्या पत्रामुळे ट्रम्प येणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने मोदींना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.