'मोदीजी जरा इकडे बघा; विकसनशील देशांच्या यादीतून ट्रम्प यांनी काढलं भारताला बाहेर'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2020 06:16 PM2020-02-14T18:16:45+5:302020-02-14T18:17:25+5:30
अमेरिकेमधील भारतीय उत्पादनांच्या निर्यातीला विविध अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
मुंबई - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प येत्या २४ फेब्रुवारीला भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. मात्र या दौऱ्याआधी यूएस प्रशासनाने भारताला मोठा झटका दिला आहे. त्यामुळे भारताच्या निर्यातीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. अमेरिका-भारत यांच्यातील व्यापाराच्या दृष्टीकोनातून ही बाब महत्वपूर्ण मानली जात आहे.
अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधींनी विकसनशील देशांच्या यादीतून भारताला बाहेर काढलं आहे. त्यामुळे भारताच्या निर्यात करावर अमेरिका सूट देणार नाही. या यादीत असणाऱ्यांना देशांना निर्यात करात सूट दिली जाते, या देशामुळे अमेरिकेच्या उद्योगांवर कोणता परिणाम होत नाही असं मानलं जातं. या यादीत ब्राझील, इंडोनेशिया, हॉंगकॉंग, दक्षिण अफ्रिका अशा देशांचा समावेश आहे.
अमेरिकेचा तर्क काय?
भारत आता जी २० देशांच्या यादीत आला आहे. जगभरातील व्यापारामध्ये त्याचा हिस्सा ०.५ टक्केपेक्षा जास्त झाला. हा निर्णय तेव्हा घेण्यात आला ज्यावेळी भारत अमेरिकेसोबत व्यापार संबंध आणि त्यातून फायदा मिळवण्याच्या प्रयत्नात होता. मात्र या यादीतून वगळल्याने भारतासाठी अडचणीचं ठरणार आहे. यूएसटीआरचं म्हणणं आहे की, ज्या देशाचा व्यापार जगात ०.५ टक्क्यापेक्षा जास्त होतो, त्याला आम्ही कायद्यानुसार विकसित देशांच्या यादीत समाविष्ट करतो.
काय परिणाम होणार?
यामुळे अमेरिकेमधील भारतीय उत्पादनांच्या निर्यातीला विविध अडचणींचा सामना करावा लागू शकतो. एखाद्या अमेरिकन उद्योग लॉबीने असा आरोप केला की एखाद्या उत्पादनात भारत सरकारच्या अनुदानामुळे अमेरिकन हितसंबंध धोक्यात येत आहेत तर त्याचा तपास सुरू होईल आणि त्या वस्तूवर अमेरिकेतील भारतीय निर्यात ठप्प होईल. त्या उत्पादनाच्या निर्यातीवर बंदी येऊ शकते. विशेष करुन कृषी उत्पादनासाठी हे नुकसानकारक आहे.
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार आहे. तेव्हा अहमदाबादला भेट देतील. त्यावेळी तिथल्या झोपड्या लपवण्यासाठी एक ६०० मीटरची भिंत बांधण्यात येत आहे पण, अशी फाटक्या झोळीला ठिगळे लावण्यापेक्षा मोदीजी जरा इकडे बघा, गरिबी झाकण्याची आता गरज नाही, कारण, ट्रम्प यांनी भारताला विकसनशील देशांच्या यादीतून वगळले असून अक्षरशः गरिबीत काढले आहे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसने लगावला आहे.