भारतातील निवडणुकांबाबत डोनाल्ड ट्रम्प बोलले असं काही, आता भाजपाचे नेते शेअर करताहेत व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 15:08 IST2025-02-20T15:08:25+5:302025-02-20T15:08:57+5:30
Donald Trump News: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जो बायडन प्रशासनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातील मतदान वाढवण्यासाठी २१ दशलक्ष डॉलर सुमारे १७४ कोटी रुपये देण्याच्या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली.

भारतातील निवडणुकांबाबत डोनाल्ड ट्रम्प बोलले असं काही, आता भाजपाचे नेते शेअर करताहेत व्हिडीओ
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जो बायडन प्रशासनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातील मतदान वाढवण्यासाठी २१ दशलक्ष डॉलर सुमारे १७४ कोटी रुपये देण्याच्या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच इतर कुणाला तरी जिंकवण्यासाठी या रकमेचा वापर केला गेला असावा अशी शक्यताही वर्तवली. डोनाल्ड ट्रम्प यांनी मियामीमधील एका संमेलनामध्ये सांगितले की, आम्ही भारतातील मतदानासाठी २१ दशलक्ष डॉलर का खर्च करत आहोत? याबाबत भारत सरकारला सांगितलं पाहिजे. ही बाब नक्कीच धक्कादायक आहे.
अमेरिकेतील डिपार्टमेंट ऑफ गव्हर्मेंट एफिशियन्सी (डीओजीई)ने यूएस एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटने भारतामध्ये मतदान वाढवण्यासाठी ही रक्कम दिली होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी सरकारी खर्चात कपात करण्यासाठी बनवलेल्या डीओजीईने अमेरिकेतील करदात्यांचा पैसा कुठे खर्च होत आहे हे सांगितले आहे.
यामध्ये भारतासाठी २१ दशलक्ष डॉलर, बांगलादेशसाठी २९ दशलक्ष डॉलर आणि नेपाळसाठी ३९ दक्षलक्ष डॉलरच्या योजनांचा समावेश होता. मात्र हे सर्व निधी आता रद्द करण्यात आले आहेत. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, आम्ही मुर्खासारखा निधी देणाऱ्या यूएसएआयडीला एक महिन्यामध्ये बंद केलं आहे. आतापर्यंत आम्ही ५५ अब्ज डॉलर वाचवले आहेत. तसेच ही केवळ सुरुवात आहे.
डीओजीईच्या या गौप्यस्फोटानंतर भारतातील सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपाने काँग्रेसवर टीका केली आहे. भाजपा नेते अमित मालविय यांनी सांगितले की, भारतातील निवडणूक प्रक्रियेमध्ये हा बाहेरून झालेला हस्तक्षेप आहे. यातून फायदा कुणाला होणार? भाजपाला तर फायदा होणार नाही. परदेशी संस्थांच्या माध्यमातून भारतातील संस्थांमध्ये नियोजनबद्धरीत्या घुसखोरी सुरू आहे, असा दावाही मालविय यांनी केला.