Donald Trump Visit: डोनाल्ड ट्रम्प यांचे दिल्लीत आगमन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 02:14 AM2020-02-25T02:14:03+5:302020-02-25T02:14:25+5:30
अनेक रस्ते बंद; आज राजघाटावर
नवी दिल्ली : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, त्यांची पत्नी मेलानिया, मुलगी इवांका, जावई जेरेड कुश्नेर आणि उच्चस्तरीय शिष्टमंडळ सोमवारी दिवसभरातील कार्यक्रम आटोपून रात्री दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यामुळे दिल्लीत अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था असून सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत. तसेच दिल्लीतील अनेक रस्ते मंगळवारी बंद राहणार आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांचे उद्या सकाळी दहा वाजता राष्ट्रपती भवनात स्वागत केले जाणार आहे. त्यासाठी ट्रम्प कुटुंबीय चाणक्यपुरीतील मौर्या हॉटेलमधून राष्ट्रपती भवनात जातील. त्यानंतर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्यासाठी राजघाटावर जाणार आहेत. राजघाट आजपासूनच पर्यटकांना बंद करण्यात आला. त्यामुळे तिथे गेलेल्या असंख्य पर्यटकांना राजघाटापर्यंत पोहोचताच आले नाही.
मेलानिया जाणार शाळेत
मेलानिया ट्रम्प या दक्षिण दिल्लीतील नानकपुरा येथील शाळेला भेट देऊन विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधणार आहेत. दिल्ली सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या हॅप्पीनेस क्लासची संकल्पना त्या समजून घेणार आहेत.
हिंदू सेनेतर्फे यज्ञ
हिंदू सेनेतर्फे जंतरमंतर येथे यज्ञ करण्यात आला. सेनेचे प्रमुख विष्णू गुप्ता यांनी सांगितले की, आम्ही यज्ञ करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांच्यासाठी आशीर्वाद मागितले. दहशतवाद संपविण्यासाठी त्यांनी एकमेकांसह काम करावे, अशी प्रार्थना केली.
डाव्यांची निदर्शने : जंतरमंतरवर डाव्या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आणि महिलांच्या जमावाने ट्रम्प यांच्या दौºयास विरोध करणारी निदर्शने केली.