Donald Trump Visit: २२ कि.मी.च्या रोड शोमध्ये उत्साहाला आले उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 01:56 AM2020-02-25T01:56:14+5:302020-02-25T01:56:28+5:30
ढोल-ताशांचा गजर आणि शंखनाद; कलाकारांनी लक्ष वेधून घेतले
अहमदाबाद : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळापासून २२ कि.मी. रोड शोला सुरुवात केली तेव्हा लोकांच्या उत्साहाला उधाण आले होते.
यावेळी साबरमती आश्रमात पोहोचण्यापर्यंत ट्रम्प आणि मोदी हे वेगवेगळ्या वाहनात दिसून आले. तत्पूर्वी, ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलानिया यांंना घेऊन आलेले एअर फोर्स वन विमान सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावर सकाळी ११ वाजून ३७ मिनिटांनी लँड झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ट्रम्प यांचे स्वागत करण्यासाठी सकाळी अहमदाबाद विमानतळावर पोहोचले होते.
ट्रम्प आणि मोदी यांनी विमानतळावरूनच रोड शोला सुरुवात केली. हा रोड शो भव्य होण्यासाठी अहमदाबाद महापालिकेने कोणतीही कसर सोडली नाही. देशातील विविध डान्स ग्रुप आणि गायक यांच्या आविष्काराने रोड शोला आणखीच रंगत आली. रस्त्याच्या दुतर्फा हजारो लोक स्वागतासाठी उभे होते.
मोटेरा स्टेडियमकडे जाणाऱ्या रस्त्यांवर दोन्ही बाजूंनी लोक उभे होते आणि हातात तिरंगा व अमेरिकी ध्वज घेऊन ट्रम्प यांचे स्वागत करत होते. विमानतळ ते मोटेरा स्टेडियम या रस्त्यांनजिक नर्तक, गायक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत होते. अनेक ठिकाणी ढोल वाजत होते तर शंखनाद लक्ष वेधून घेत होता. ट्रम्प यांनी काळ्या रंगाचा सूट आणि पिवळ्या रंगाचा टाय परिधान केला होता. मेलानिया ट्रम्प यांनी पांढरा जम्पसूट परिधान केला होता. या मार्गात ५० स्टेज उभारण्यात आले होते.
अतिथी देवो भव:
सप्टेंबर २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौºयात ह्युस्टनमध्ये हाउडी मोदी कार्यक्रमानंतर दोन्ही नेत्यांमध्ये संबंध आणखी दृढ झाले आहेत. भारतात पोहोचण्यापूर्वी ट्रम्प यांनी टष्ट्वीट केले की, भारतात येण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. काही वेळातच सर्वांशी चर्चा करू. याचे उत्तर देताना पंतप्रधान मोदी यांनी टष्ट्वीट केले की, ‘अतिथी देवो भव:’