Donald Trump Visit: दहशतवादाविरुद्ध एकत्र लढू या; डोनाल्ड ट्रम्प यांची भारतीयांना ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 04:03 AM2020-02-25T04:03:14+5:302020-02-25T06:43:20+5:30
अहमदाबाद व आग्रा शहरात स्वागताला जमले लाखो लोक
अहमदाबाद : आपल्या जनतेचे कट्टर इस्लामिक दहशतवादापासून रक्षण भारत व अमेरिका करण्यास कटिबद्ध आहे. भारत-अमेरिकेने दहशतवादाची झळ सोसली आहे. इराक-सीरियातील दहशतवादी संघटना आम्ही पूर्णत: नष्ट केल्या. इसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादीला संपविले. पाकिस्तानलाही दहशतवादी संघटनांविरुद्ध कारवाई करावी लागेल. भारत-अमेरिका दहशतवादाविरुद्ध लढण्यास कटिबद्ध आहे. ही लढाई एकत्रपणे लढावी लागेल, असे उद्गार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी अहमदाबादमध्ये एक लाख भारतीयांसमोर काढताच प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून, भारतीय ध्वज फडकावून आणि ‘भारतमाता की जय’ अशा घोषणा देत त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
अमेरिका हा भारताचा सदैव विश्वासू आणि निष्ठावंत मित्र राहील, अशी ग्वाही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी येथील मोटेरा क्रिकेट स्टेडियममध्ये त्यांच्या स्वागताप्रीत्यर्थ आयोजित ‘नमस्ते ट्रम्प’ या कार्यक्रमात दिली. भारत आणि अमेरिकेची मैत्री स्वाभाविक आणि टिकाऊ आहे, असे सांगून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दहशतवाद, आर्थिक, व्यापार, संरक्षण, अंतराळ संबंधांसह आपसातील मैत्री दृढ करण्याचे सूतोवाच केले. सोबतच त्यांनी भारताची महान संस्कृती, परंपरेची प्रशंसा करीत भारतीय क्रिकेट आणि बॉलीवूडच्या प्रतिभेचाही आवर्जून उल्लेख केला.
तीन अब्ज डॉलरचा संरक्षण करार
आम्ही मंगळवारी तीन अब्ज डॉलरचा संरक्षण करार करणार आहोत. अमेरिका भारताचा प्रमुख संरक्षण भागीदार होेईल. सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.
पाकिस्तान दहशतवादी संघटनांविरुद्ध काही पावले उचलत असल्याचे वाटते, असेही त्यांनी बोलून दाखवले.
शांततेसाठी भारताची भूमिका मोठी असेल. आम्ही सर्वोत्कृष्ट विमाने, रॉकेट, शस्त्रे बनवितो. ती भारताला देऊ. भारत-प्रशांत विभाग सुरक्षित ठेवायचा आहे, असे ट्रम्प म्हणाले.
आम्ही जगाची दिशा ठरवू
ट्रम्प यांचा दौरा हा दोन देशांच्या संबंधांतील नवा अध्याय आहे. लोकांची प्रगती-समृद्धी यासाठीही हा दौरा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आमची आर्थिक भागीदारी आणखी चांगली होईल. एकविसाव्या शतकातील जगाची दिशा ठरविण्यात भारत-अमेरिका संबंधांची महत्त्वाची भूमिका असेल. - नरेंद्र मोदी
भारताने ७0 वर्षांत मोठी प्रगती केली
सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या भारताने मानवतेच्या आशा पल्लवित केल्या. एक देश जबरदस्तीने पुढे जातो. पण जो देश जनतेला सर्व बंधनांतून मुक्त ठेवून त्यांची स्वप्ने पूर्ण करतो, तोच देश महान असतो, अशा देशांपैकी भारत एक आहे. या भारताने ७0 वर्षांत मोठी प्रगती केली आहे. - डोनाल्ड ट्रम्प
कुटुंबीयही आले...
डोनाल्ड ट्रम्प यांचा हा पहिला भारत दौरा. त्यांच्या या दोन दिवसांच्या भारत दौºयाची सुरुवात अहमदाबाद भेटीने केली. त्यांच्यासमवेत पत्नी मेलेनिया, कन्या इव्हांका, जावई जेअर्ड कुश्नर व सरकारचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ आले आहे.
सात वेळा गळाभेट
नरेंद्र मोदी व डोनाल्ड ट्रम्प यांनी तीन तासांमध्ये ७ वेळा गळाभेट घेतली तसेच ९ वेळा हस्तांदोलन केले. हाऊडी मोदी कार्यक्रमानंतर नमस्ते ट्रम्प कार्यक्रमाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. येथेही मोदी व ट्रम्प यांची मैत्री जगाला पाहायला मिळाली.
मोदी व ट्रम्प यांनी अहमदाबादेतील तीन तासांच्या विविध कार्यक्रमांमध्ये ७ वेळा गळाभेट घेतली. त्यात नमस्ते ट्रम्प कार्यक्रमात ६ वेळा गळाभेट झाली. ट्रम्प यांचे विमानतळावर आगमन झाल्यावर प्रथम गळाभेट घेतली.
२२ वेळा ट्रम्प शब्दाचा उच्चार
अहमदाबादेतील खचाखच भरलेल्या मोटेरा स्टेडियममध्ये मोदी व ट्रम्प हे ५३ मिनिटे १२ सेकंद होते. या वेळी ट्रम्प यांनी २७ मिनिटे तर मोदींनी दोन वेळा मिळून २१ मिनिटांचे भाषण केले. मोदी यांनी आपल्या भाषणात ४१ वेळा भारताचा उल्लेख केला तर २९ वेळा अमेरिका हा शब्द उच्चारला. त्यांनी २२ वेळा ट्रम्प यांचे नाव उच्चारले. ट्रम्प यांनी तर ५० वेळा इंडियाचा (भारत) तर २३ वेळा अमेरिकेचा उल्लेख केला. त्यांनी मोदींचे नाव १३ वेळा उच्चारले.
पंतप्रधान मोदी यांची स्तुती...
मोदी विलक्षण नेते आहेत. चहावाला म्हणून मोदी यांनी सुरुवातीला काम केले. भारतीय मेहनतीने कोणत्याही मोठ्या पदावर जाऊ शकतात, याचे ते आदर्श उदाहरण आहेत. भारताचा आम्हाला अभिमान आहे. कोट्यवधी लोकांनी त्यांच्या हाती मागच्या वर्षी पुन्हा सत्ता दिली. मोदींनी घराघरात वीज, गॅस पोहोचवला.
लोकांना इंटरनेटशी जोडले. महामार्गाचे जाळे विस्तारले. भारत गरिबीतून बाहेर पडत असून, लवकरच भारत मध्यमवर्गीयांचा मोठा देश बनेल. मोदी माझे चांगले मित्र आहेत. ते चांगल्या प्रकारे वाटाघाटी करतात. आमच्यात व्यावसायिक संबंधांवर चर्चा होत आहे.
ट्रम्प म्हणतात...
भारत-अमेरिकेची मैत्री स्वाभाविक व टिकाऊ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जनतेचा विश्वास आहे, ही चांगली बाब आहे. आमच्या दोन देशांतही काही फरक आहे; परंतु आत्मा एकच आहे.
स्वामी विवेकानंद यांनी यासंदर्भात एकदा उल्लेख केला होता. या आत्मबळाने भारतीय लोक हिंमत बाळगून अवघ्या जगाला प्रकाशवाट दाखवितात. भारताने व्यक्तिगत स्वातंत्र्य, कायद्याचे राज्य, प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठा जपली आहे. येथे सर्व समुदायाचे लोक सहिष्णुता आणि सलोखा राखत आपापल्या धर्माचे पालन करू शकतात.
शोले, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे... सचिन, विराट!
ट्रम्प यांनी भाषणात बॉलीवूडच्या प्रतिभेची मुक्तकंठाने प्रशंसा केली. शोले, अभिनेता शाहरूख खान यांच्या दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या लोकप्रिय चित्रपटांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
या देशात दरवर्षी दोन हजार चित्रपटांची निर्मिती होते. प्रतिभा व सर्जनशीलता अशी बॉलीवूडची ओळख आहे. भांगडा, भारतीय संगीत, नृत्य, नाटक व चित्रपटांचा जगभरातील लोक मनसोक्त आनंद घेतात.
सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली व विराट कोहली यांच्या नावाचा उल्लेख करताच स्टेडियममध्ये उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ‘स्टॅच्यू आॅफ युनिटी’ या भव्य स्मारकाने भारावलो असल्याचेही ते म्हणाले.
चरख्यावर सूतकताई
ट्रम्प यांचे विशेष विमान दुपारी अहमदाबाद विमानतळावर आले, तेव्हा तेथे स्वागताला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. ट्रम्प विमानातून खाली येताच दोघा नेत्यांनी एकमेकांना मिठी मारली. विमानतळावर गुजराती लोकनृत्य व गरबा पाहून ट्रम्प व मोदी स्वतंत्र कारने साबरमती आश्रमाला गेले. चरख्यावर सूतकताई कशी करतात, हे मोदी यांनी त्यांना सांगितले आणि एक चरखाही भेट दिला. स्टेडियमपर्यंतच्या मार्गावर ट्रम्प यांच्या स्वागताला हजारो लोक उभे होते.