Donald Trump Visit: मोदी, ट्रम्प यांनी मैैदान व मनेही जिंकली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 02:08 AM2020-02-25T02:08:34+5:302020-02-25T02:09:04+5:30
अमेरिका-भारत घनिष्ठ मैत्रीचा ऐतिहासिक महोत्सव
नवी दिल्ली/अहमदाबाद : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका व भारत यांच्यातील घनिष्ठ मैत्रीचा न भूतोे, असा जाहीर महोत्सव अहमदाबादमध्ये सादर करून मैदानासह मनेही जिंकली. द्विपक्षीय संबंधांच्या एरवी बंद दरवाजांआड धीरगंभीर वातावरणात होणाऱ्या चर्चेला लाखो प्रेक्षकांच्या साक्षीने झालेल्या इव्हेंटची जोड देऊन जगातील दोन सर्वात मोठ्या लोकशाही देशांच्या नेत्यांनी आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीला एका वेगळ््याच पातळीवर नेऊन सोडले.
मोदी व ट्रम्प या दोन्ही नेत्यांच्या व्यक्तिमत्वाचा शोबाजी हा स्थायीभाव असल्याने दोघांनीही त्या चातुर्याचा अहमदाबादमध्ये पुरेपूर वापर केला. ‘नमस्ते ट्रम्प’च्या रूपाने जणू संपूर्ण भारत अमेरिकी पाहुण्यांचे उत्साहाने स्वागत करत असल्याचे चित्र मोठ्या प्रभावीपणे साकारले गेले. ट्रम्प या स्वागताने भारावून गेले व ‘अमेरिका हा भारताचा सच्चा मित्र आहे व तसाच तो सदैव राहील’ हे त्यांनी खच्चून भरलेल्या मोटेरा स्टेडियममध्ये जाहीर करून टाकले. परस्परांवर स्तुतीसुमने उधळण्याची ट्रम्प व मोदी यांची जाहीर जुगलबंदीही झाली.
गेल्या वर्षी मोदी अमेरिकेत गेले होते, तेव्हा 'ह्यूस्टनमध्ये ‘हाऊडी मोदी’ हा कार्यक्रम केला होता. तेव्हा भाषणात मोदींनी ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या फेरनिवडणुकीच्या प्रचाराचा जणू नारळ फोडला होता. त्याच धर्तीवर त्याहून दुप्पट मोठा कार्यक्रम मोदींनी आपल्या होमपिचवर सादर करून आंतरराष्ट्रीय संबंधांसारख्या रुक्ष विषयाशीही जनतेची नाळ जोडून घेतली. अमेरिकेला जागतिक राजकारणातही भारत किती गरजेचा वाटतो हेच दिसून आले. व्यापार आणि सामरिक क्षेत्रात चीनच्या दबदब्याला शह देण्यासाठी अमेरिकेला भारताशी जवळीक ठेवणे गरजेचे आहे.
हेलिकॉप्टर देणार
मोदी हे व्यक्तीगत पातळीवर घनिष्ट मित्र असले तरी वाटाघाटींमध्येही ते तेवढेच तरबेज आहेत, असे सांगून ट्रम्प यांनी दोन्ही देशांमध्ये व्यापारविषयक एक मोठा करार नक्की होऊ शकेल, अशी आशा व्यक्त केली. भारताला ‘अॅपाचे’ लढाऊ हेलिकॉप्टर्ससह अन्य अद्ययावत युद्धसामुग्री विकण्याचा तीन अब्ज डॉलरचा करार करण्यात येणार असल्याचेही ट्रम्प यांनी दौरा संपण्याची वाट न पाहता जाहीर केले.