Donald Trump Visit: ट्रम्प यांचे कुटुंबीय ताजमहालाच्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 02:05 AM2020-02-25T02:05:12+5:302020-02-25T06:54:06+5:30

प्रेमाचे प्रतीक ठरलेली वास्तू पाहून ट्रम्प दाम्पत्य आश्चर्यचकित

Donald Trump Visit: Trump's family in love with the Taj Mahal | Donald Trump Visit: ट्रम्प यांचे कुटुंबीय ताजमहालाच्या प्रेमात

Donald Trump Visit: ट्रम्प यांचे कुटुंबीय ताजमहालाच्या प्रेमात

Next

आग्रा (उत्तर प्रदेश) : डोनाल्ड ट्रम्प व मेलानिया ट्रम्प यांनी सोमवारी जगप्रसिद्ध ताज महलला भेट दिली व १७ व्या शतकात मुघल राजवटीत प्रेमाचे प्रतीक ठरलेली ही वास्तू पाहून ट्रम्प दाम्पत्य आश्चर्यचकित झाले.

ट्रम्प दाम्पत्यासोबत मुलगी इव्हान्का, जावई जेरेड कुशनेर यांचे अहमदाबादहून आगमन झाले. मुघल बादशाह शाह जहान याने आपली पत्नी मुमताझ महल हिच्या स्मरणार्थ ताज महलची निर्मिती केली. मुमताझ हिचे निधन १६३१ मध्ये झाले. डोनाल्ड व मेलनिया ट्रम्प यांनी एकमेकांचे हात हाती घेऊन ताज महल परिसरात फेरफटका मारून अभ्यागतांच्या अभिप्राय पुस्तकात मत लिहिले. या दोघांना ताज महलचा इतिहास आणि स्मारक म्हणून असलेले महत्व थोडक्यात सांगण्यात आले.

ट्रम्प कुटुंबियांच्या आग्रा भेटीची खूपच मोठी उत्सुकता स्थानिक रहिवाशांत निर्माण झाली होती. काही दुकानांनी ट्रम्प यांचे भारतात स्वागत असे फलक स्वत:हून लावले होते. भारताच्या पहिल्या अधिकृत भेटीबद्दलच्या भावना डोनाल्ड ट्रम्प यांनी टिष्ट्वटरवर हिंदी भाषेतून व्यक्त केल्या. ‘‘मेलानिया आणि मी आठ हजार मैलांचा प्रवास केला तो भारताच्या प्रत्येक नागरिकाला अमेरिका भारतावर प्रेम करतो, अमेरिका भारताचा मान राखतो आणि अमेरिकेचे लोक हे नेहमीच भारतीय लोकांचे खरेखुरे आणि निष्ठावंत मित्र राहतील हा संदेश देण्यासाठी.’’ येथील खेरिया विमानतळापासून ट्रम्प यांच्या ३० पेक्षा जास्त वाहनांचा ताफा ताज महल जवळच्या ओबेरॉय अमरविलास हॉटेलकडे निघाला. त्यांच्या स्वागतासाठी १५ हजारांपेक्षा जास्त शालेय विद्यार्थी रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी उभे होते.

मेलानिया ट्रम्प यांचा जम्पसूट
अहमदाबाद : मेलानिया ट्रम्प यांच्या अंगात सोमवारी पांढरा जम्पसूट होता व हिरवा रेशमी व कशिदाकाम केलेला पट्टा त्यांनी कंबरेला गुंडाळलेला होता. भारताच्या पहिल्याच दौऱ्यावर त्यांचे येथे आगमन होताच भारतीय वस्त्रांच्या वारसाबद्दल आदर म्हणून त्यांनी त्यांच्या डोक्यावरील टोपी काढली. मेलानिया यांच्या या हवेशीर जम्पसूटचे डिझाईन फ्रेंच-अमेरिकन कॉच्युम डिझायनर हिर्वे पिएरे यांनी तयार केले होते. हा जम्पसूट कंबरेला घट्ट बांधलेला होता तो शेवाळी हिरव्या रंगाच्या आणि गोल्डन मेटालिक धाग्यांनीयुक्त अशा पट्ट्याने. पिएरे यांच्या मित्रांनी विसाव्या शतकातील भारतीय वस्त्रांचा दस्तावेज त्यांना दिला होता त्यात या पट्ट्याचे डिझाईन त्यांना सापडले.

‘हॅलो टू इंडिया’
ट्रम्प यांनी भाषणाची सुरुवात ‘नमस्ते... नमस्ते’ हॅलो टू इंडिया’ अशी केली. ग्रेट चॅम्पियन ऑफ इंडिया, भारतासाठी अहोरात्र काम करणारे असाधारण नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी आभार मानतो. त्यांना सच्चा मित्र म्हणून संबोधण्यात मला अभिमान वाटतो. मी आणि माझी पत्नी ८ हजार किलोमीटरवरून भारतातील प्रत्येकाला ‘अमेरिका लव्हज् इंडिया’ हा संदेश देण्यासाठी आलो आहे.
पाच महिन्यांपूर्वी अमेरिकेने पंतप्रधान मोदी यांचे भव्य फुटबॉल स्टेडियमवर स्वागत केले होते. आज भारत आमचे अहमदाबादेतील जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर स्वागत करीत आहे. तुमच्यासोबत येथे उपस्थित असल्याचा मला अभिमान वाटतो. माझे, माझी पत्नी मेलानिया, माझ्या कुटुंबियांचे आपण शानदार स्वागत केले. ते आमच्या आठवणीत राहील.

Web Title: Donald Trump Visit: Trump's family in love with the Taj Mahal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.