Donald Trump Visit: साबरमती आश्रमाला ट्रम्प यांची धावती भेट; पण गांधीजींचा विसर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 02:00 AM2020-02-25T02:00:07+5:302020-02-25T06:43:56+5:30
१५ मिनिटांत गांधी महात्म्याची तोंडओळख
अहमदाबाद : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व ‘फर्स्ट लेडी’ मेलानिया ट्रम्प यांनी सोमवारी दुपारी येथील साबरमती आश्रमाला केवळ १५ मिनिटांसाठी धावती भेट दिली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या या आश्रमाला भेट देणारे ट्रम्प हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले.
मोटेरा स्टेडियममधील मुख्य कार्यक्रमाच्या आधी ट्रम्प दाम्पत्य साबरमती आश्रमात पोहोचण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही तेथे आले. मोदी यांना ट्रम्प व त्यांच्या पत्नीसोबत आश्रमाचा फेरफटका मारून पाहुण्यांना आश्रमाविषयी आणि गांधीजींच्या तेथील प्रदीर्घ वास्तव्याविषयी थोडक्यात माहिती दिली. महात्मा गांधी व कस्तुरबा आश्रमात जेथे राहत त्या आश्रमातील ‘हृदय कुंज’ दालनही मोदींनी ट्रम्प यांना दाखवले. आश्रमाच्या भेटीच्या वेळी मोदींप्रमाणेच ट्रम्प व त्यांच्या पत्नीनेही खांद्यावर खादीचे उपरणे घेतले होते. मोदी व ट्रम्प यांना साबरमती नदीपात्राचे विस्तृत दर्शन घेता यावे यासाठी आश्रमाच्या पाठीमागे नदी किनारी एक खास चौथरा तयार करण्यात आला होता; परंतु रणरणते ऊन व वेळेचा अभाव यामुळे कार्यक्रमातील हा संभाव्य भाग वगळण्यात आला.
ट्रम्प दाम्पत्याने चालवला चरखा
आश्रमात ठेवलेला गांधीजींचा चरखाही ट्रम्प दाम्पत्याने चालवून पाहिला व त्यावर सूतकताई कशी करतात, हेही समजून घेतले. स्वातंत्र्यलढा व स्वदेशीसंदर्भात गांधीजींनी चरखा आणि त्यावरील सूतकताईस कसे महत्त्व दिले होते, हेही मोदी यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना समजावून सांगितले.
गांधीजींचा विसर
आश्रमातील महात्माजींच्या तसबिरीला चांदीच्या फुलांचा हार घालून ट्रम्प यांनी गांधीजींना आदरांजली वाहिली खरी, पण या भेटीची स्मृती चिरंतन राहावी म्हणून ट्रम्प यांनी तेथील व्हिजिटर्स बुकमध्ये जो संदेश लिहिला त्यात त्यांनी गांधीजींचा उल्लेखही केला नाही. त्यांनी लिहिले की, या अप्रतिम भेटीबद्दल मी माझे थोर मित्र मोदी यांचा आभारी आहे!