Donald Trump Visit: 'ते पूर्वी चहा विकायचे'; एवढं बोलून ट्रम्प मधेच थांबले अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 04:12 PM2020-02-24T16:12:02+5:302020-02-24T16:12:11+5:30
Donald Trump : आज आमचे ज्या प्रकारे स्वागत करण्यात आले ते आमच्या कायम स्मरणात राहणार आहे. तसेच त्यामुळे भारताने आमच्या हृदयात विशेष स्थान बनवले आहे.
अहमदाबाद - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दोन दिवसांच्या भारत दौऱ्याला आजपासून सुरुवात झाली आहे. आज अहमदाबाद येथे आगमन झालेल्या डोनाल्ड ट्रम्प यांचे भव्य स्वागत करण्यात आले. दरम्यान, या स्वागतानंतर मोटेरा स्टेडियममध्ये झालेल्या कार्यक्रमात डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली.
''आज आमचे ज्या प्रकारे स्वागत करण्यात आले ते आमच्या कायम स्मरणात राहणार आहे. तसेच त्यामुळे भारताने आमच्या हृदयात विशेष स्थान बनवले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक सामान्य चायवाला म्हणून आपल्या जीवनाला सुरुवात केली होती. त्यांनी लहानपणी चहाची विक्री केली. आज त्यांचे सारेजण कौतुक करतात. मात्र इथपर्यंत पोहोचणे खूप कठीण आहे, हे मी सांगू शकतो. खरंतर हा केवळ भारतीय लोकशाहीचा चमत्कार आहे,'' असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. ट्रम्प यांचे हे उदगार ऐकताच मोदी जागेवरून उठले. त्यांनी ट्रम्प यांचे हातात हात घेतले.
दरम्यान, ''काही महिन्यांपूर्वी जेव्हा मोदी ह्युस्टन येथे आले होते. तेव्हा त्यांचे स्वागत हाऊडी मोदी कार्यक्रमात फुटबॉल स्डेडियमवर करण्यात आले होते. आज जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्डेडियम असलेल्या मोटेरावर माझे स्वागत करण्यात आले,'' असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
तत्पूर्वी डोनाल्ड ट्रम्य यांचे भारतात आगमन झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजशिष्टाचाराला फाटा देत ट्रम्प यांची गळाभेट घेऊन त्यांचे स्वागत केले. त्यानंतर तिन्ही दलांच्या जवानांनी ट्रम्प यांना मानवंदना दिली. तसेच विविध राज्यातील सांस्कृतिक पथकांनी सादर केलेल्या पारंपरिक नृत्यांमधून ट्रम्प यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी साबरमती आश्रमाला भेट दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना महात्मा गांधींच्या आश्रमाबाबत माहिती दिली. तसेच ट्रम्प यांनी आश्रमातील चरख्यावर सूतकताई केली.