Donald Trump's Visit : मोटेरामध्ये PM मोदींनी 21 मिनिटांच्या भाषणात 22 वेळा घेतलं ट्रम्प यांचं नाव
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 06:29 PM2020-02-24T18:29:28+5:302020-02-24T18:35:15+5:30
Donald Trump's India Visit : मोटेरा स्टेडियममध्ये 'नमस्ते ट्रम्प' कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामधील खास मैत्री दिसून आली.
अहमदाबादः मोटेरा स्टेडियममध्ये 'नमस्ते ट्रम्प' कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामधील खास मैत्री दिसून आली. मोदी यांनी जनतेला संबोधित करताना डोनाल्ड ट्रम्प मित्र असल्याचं सांगत 'माझा मित्र, भारताचा मित्र आहे,' हे अधोरेखित केलं. बऱ्याच गोष्टी आमच्यात सामायिक आहेत. मूल्ये आणि आदर्श, उद्योजकता आणि नावीन्यपूर्ण भावना, संधी आणि आव्हाने, आशा आणि आकांक्षा, अशा बऱ्याच गोष्टी आमच्यात एकसारख्याच असल्याचं मोदी म्हणाले आहेत.
आपल्या 21 मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 22 वेळा ट्रम्प यांचं नाव घेतलं आहे. त्याचबरोबर त्यांच्या तोंडातून 29 वेळा अमेरिकेचाही उच्चार आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणात भारताचं नाव 41 वेळा, दोस्त 14 वेळा, परिवार 4 वेळा, डिजिटल 4 वेळा, इतिहास, फर्स्ट लेडी आणि इवांका 2 वेळा, सरदार पटेल आणि ट्रस्ट 3 वेळा, लोकतंत्र 1, आतंकवाद 2, भारत- अमेरिका संबंध 7, नमस्ते ट्रम्प 7, गुजरात 2, इतिहास 2, मेलानिया 2, कल्चर 2, स्पेस 2 वेळा आणि डिफेन्स, विकाससारखे शब्द एकदा उच्चारले आहेत.
दोस्तीच्या केल्या घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोटेरा स्टेडियममध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं स्वागत केलं, यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारत-अमेरिकेच्या मैत्रीच्या घोषणा दिल्या आणि नमस्ते ट्रम्प असं म्हणाले. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं पूर्ण कुटुंब अहमदाबादेत आलं असून, साबरमती आश्रमालाही भेट दिली आहे. ही जमीन गुजरातची असून, आज पूर्ण भारताचं चित्र इथून दिसत आहे. आज अमेरिका आणि भारताच्या नात्यानं नवी उंची गाठली आहे.
मोदींनी गळाभेटीनं केलं स्वागत
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसांच्या दौऱ्यात सोमवारी सकाळी गुजरातमधील अहमदाबादेत पोहोचले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इथल्या एअरपोर्टवर डोनाल्ड ट्रम्प यांची गळाभेट घेऊन स्वागत केलं. यावेळी फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्पही त्यांच्याबरोबर होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी अहमदाबादेतील साबरमती आश्रमाचा दौरा केला असून, महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
साबरमती आश्रमानंतर पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प मोटेरा स्टेडियमला गेले. मोटेरा स्टेडियममध्ये मोदींनी जनतेला संबोधित केलं. मोदींनी स्टेजवरून नमस्ते ट्रम्पचा आवाज दिला आणि स्टेडियममधल्या उपस्थित लोकांनीही नमस्ते ट्रम्प असं म्हटलं.
नमस्तेचा अर्थ खूप सखोल
मोदी म्हणाले, या कार्यक्रमाचं नाव नमस्ते आहे, याचा अर्थ खूप सखोल आहे. ही जगातल्या सर्वात जुन्या भाषांपैकी एक आहे. हा एक संस्कृत शब्द आहे. याचा अर्थ फक्त व्यक्तीशी निगडित नव्हे, तर त्याच्या आतील दिव्यतेशी संबंधित आहे. ट्रम्प कुटुंबीय आणि भारताबरोबर एक खासगी संबंधांचा उल्लेख करत मेलानिया यांनी केलेल्या कामाचा गौरव केला आहे. तसेच इवांका यांच्या मागच्या यात्रेचाही उल्लेख केला आहे. अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प तुमचं इथे असणं ही एक सन्मानाची गोष्ट आहे. एक स्वस्थ आणि आनंदी अमेरिकेसाठी तुम्ही जे केलं, त्याचे चांगले परिणाम समोर येत आहेत. समाजातील मुलांसाठी तुम्ही जे काम करत आहात, ते खरंच उल्लेखनीय आहे.