'आता सरकारकडे मागू नका, सरकार कोणते आणायचे ठरवा'; नाना पाटेकरांचे शेतकऱ्यांना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 01:00 PM2024-03-05T13:00:41+5:302024-03-05T13:14:55+5:30
नाना पाटेकर यावेळी शेतकऱ्यांची बाजू घेत ते म्हणाले की, पूर्वी ८०-९०% शेतकरी होते, आता ५०% शेतकरी आहेत.
देशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात बॉलिवूड आणि मराठी अभिनेते नाना पाटेकर यांनीही पाठिंबा दिला आहे. यावेळी नाना पाटेकर यांनी शेतकऱ्यांना महत्वाचं आवाहन केलं आहे. आता वेळ आली आहे की, शेतकऱ्यांनी काहीही न मागता, त्यांना देशात कोणाचे सरकार आणायचे आहे, हे ठरवावे, असं नाना पाटेकर म्हणाले. शेती अर्थ प्रबोधिनीद्वारा नाशिक येथे ११ वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाच्या उद्घाटन सत्रात नाना पाटेकर बोलत होते. यावेळी पाटेकरांनी रोखठोक भूमिका मांडली आहे.
नाना पाटेकर यावेळी शेतकऱ्यांची बाजू घेत ते म्हणाले की, पूर्वी ८०-९०% शेतकरी होते, आता ५०% शेतकरी आहेत. आता सरकारकडे काही मागू नका. आता कोणाचे सरकार आणायचे ते ठरवा. मी राजकारणात जाऊ शकत नाही कारण माझ्या पोटात जे असेल ते तोंडावर येईल. ते माझी पक्षातून हकालपट्टी करतील. पक्ष बदलल्याने महिनाभरात सर्व पक्ष संपुष्टात येतील. इथे आम्ही तुमच्यासमोर म्हणजे, आमच्या शेतकरी बांधवांसमोर मनापासून बोलू शकतो, असं नाना पाटेकर यांनी सांगितले.
'मी शेतकरी म्हणून जन्म घेईन'
शेतकऱ्यांशी संवाद साधताना नाना पुढे म्हणाले, मी आत्महत्या केली तरी शेतकरी म्हणून जन्म घेईन, शेतकरी कधीच म्हणणार नाही की मला शेतकरी म्हणून जन्म घ्यायचा नाही. आम्हाला जनावरांची भाषा कळते, शेतकऱ्यांची भाषा वेळेत कशी बोलावी हे कळत नाही का?, असा सवालही नाना पाटेकर यांनी उपस्थित केला.
१० मार्च रोजी 'ट्रेन रोको'-
शेतकऱ्यांनी त्यांच्या 'दिल्ली चलो' मोर्चाचे नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. देशभरातील शेतकऱ्यांना ६ मार्चला दिल्ली गाठण्याचे आवाहन शेतकरी नेत्यांनी केले आहे. शेतकरी आंदोलकांनी १० मार्च रोजी 'ट्रेन रोको' आंदोलनाची घोषणाही केली आहे. तसेच सीमाभागातील शेतकऱ्यांची संख्या आणखी वाढविण्यात येणार असल्याचे सांगितले.