'माझ्यासारखा अजिबात होऊ नको', १२ वर्षाच्या मुलाला नारायण मूर्तींचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 04:28 PM2024-09-04T16:28:47+5:302024-09-04T16:31:54+5:30
Narayana Murthy Advice : इन्फोसिस कंपनीचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनी एक १२ वर्षाच्या मुलाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना माझ्यासारखा अजिबात होऊ नको, असा सल्ला दिला. त्यांच्या या सल्ल्याची आता चर्चा होत आहे.
Narayana Murthy News : इन्फोसिस कंपनीचे सह-संस्थापक असलेले नारायण मूर्ती अनेकांचे आदर्श आहेत. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करणारे आणि काम करू इच्छिणारे अनेकजण त्यांचे अनुकरणही करतात. एका विद्यार्थ्याने नारायण मूर्तींना याचसंदर्भात प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी माझ्यासारखा अजिबात होऊ नको, असा सल्ला दिला. ('Do not to become like me', Narayana Murthy advice to a 12-year-old student.)
नारायण मूर्ती एका शाळेच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी दिलेल्या या उत्तराने सगळेच आश्चर्यचकीत झाले.
नारायण मूर्तींना विद्यार्थ्याने काय विचारला होता प्रश्न?
शाळेत शिकणाऱ्या एका १२ वर्षाच्या विद्यार्थ्याने नारायण मूर्तींना प्रश्न विचारला. तो म्हणाला, 'मला तुमच्यासारखे बनायचे आहे, त्यासाठी मला काय करावे लागेल?' या प्रश्नाला नारायण मूर्तींनी जे उत्तर दिले, ते ऐकून सगळेच अवाक् झाले.
विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नारायण मूर्ती म्हणाले, "मला वाटते की तू माझ्यासारखे होऊ नये. मला वाटते की, तू राष्ट्रच्या कल्याणासाठी माझ्यापेक्षा चांगले व्हावे."
नारायण मूर्ती विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हणाले, "माझ्या वडिलांनी वेळापत्रकाच्या माध्यमातून मला वेळेचे महत्त्व समजून सांगितले होते. वडिलांनी लावलेल्या शिस्तीचा फायदा SSLC परीक्षेत चौथ्या क्रमांकाने पास झालो, तेव्हा झाला."
अपयश स्वीकारा, नारायण मूर्तींनी कोणते सल्ले दिले?
विद्यार्थ्यांशी बोलताना नारायण मूर्ती म्हणाले, अपयशाची जबाबदारी घ्यायला शिका. ते स्वीकारा. त्याचबरोबर अभिमानाचे क्षण आपल्या सहकाऱ्यांसोबत साजरे करा. प्रत्येकाने जबाबदार नागरिक व्हायला हवे आणि असे काम करायला हवे की, राष्ट्राच्या हिताचे असेल.