निवडणुकांच्या बाबतीत अतिआत्मविश्वास नकाे! पंतप्रधान माेदींचा कार्यकर्त्यांना सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2023 06:09 AM2023-04-07T06:09:37+5:302023-04-07T06:10:08+5:30

भाजपच्या स्थापना दिनी पंतप्रधानांनी केले मार्गदर्शन

Don't be overconfident about elections! PM Modi's advice to activists | निवडणुकांच्या बाबतीत अतिआत्मविश्वास नकाे! पंतप्रधान माेदींचा कार्यकर्त्यांना सल्ला

निवडणुकांच्या बाबतीत अतिआत्मविश्वास नकाे! पंतप्रधान माेदींचा कार्यकर्त्यांना सल्ला

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: ‘भाजप हनुमानजींच्या ‘कॅन डू (करू शकतो) वृत्तीप्रमाणे वागते आणि सर्वांना मदत करण्याचाही प्रयत्न करते,’ अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या ४३व्या स्थापना दिनी व्यक्त केली. कार्यकर्त्यांना त्यांनी आगामी निवडणुकांच्या बाबतीत अतिआत्मविश्वास न बाळगण्याचा सल्लाही दिला.

भाजप स्थापना दिनानिमित्त मोदींनी कार्यकर्त्यांना ४५ मिनिटे संबोधित केले. हनुमान जयंतीनिमित्त त्यांच्या कामांची उदाहरणे देत भाजपच्या कार्यशैलीचा उल्लेख करताना ते म्हणाले की, हनुमानजी सर्व काही करू शकतात, सर्वांसाठी करतात, पण स्वत:साठी काहीही करत नाहीत. ही भाजपची प्रेरणा आहे.

थडगे खोदण्याची धमकी

‘आमची चेष्टा करून जेव्हा ते यशस्वी झाले नाहीत, तेव्हा साम्राज्यवादी मानसिकतेच्या लोकांचा द्वेष आणखी वाढला. अनेक दशकांपासून हिंसाचाराचा सामना करत असलेल्या काश्मीर आणि ईशान्येकडील भागात शांततेचा सूर्य उगवेल, असे त्यांना वाटले नव्हते. कलम ३७० इतिहासजमा होईल याची कल्पनाही त्यांनी केली नव्हती. ही कामे त्यांच्या पचनी पडत नाही. निराशाग्रस्त होऊन ते थडगे खोदण्याची धमकी देत आहेत. परंतु सामान्य जनता आज भाजपची ढाल बनून उभी आहे.

विरोधी ऐक्यात राष्ट्रवादी, ठाकरे गटाचा ‘जमेल तसा’ सहभाग

संसदेच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधकांच्या तिरंगा मोर्चात सहभागी झालेल्या वीस पक्षांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचाही समावेश असल्याचा दावा काँग्रेसने केला. या मोर्चात ठाकरे गटाकडून प्रियांका चतुर्वेदी सामील झाल्या. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधी दिसले नाहीत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विरोधी पक्षांच्या पत्रकार परिषदेकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पाठ फिरविली. संसदेचे कामकाज सतत ठप्प होत असल्यामुळे तसेच राज्यात पक्षाचे काम वाढल्यामुळे आम्ही बुधवारीच दिल्ली सोडली, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. मात्र, हा ‘जमेल तसा’ सहभाग पाहता मविआतील हे दोन्ही घटक पक्ष काँग्रेसपासून सावध अंतरावर राहू पाहत आहेत का? अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. 

मोदींनी संभ्रम न ठेवता कठोर निर्णय घेतले: अमित शाह

सलंगपूर (गुजरात): “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणताही संभ्रम न बाळगता काही कठोर निर्णय घेतले आणि त्यांची अंमलबजावणी करताना देशात शांतता आणि सुव्यवस्था राखली,” असे मत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, भाजपने स्थापनेनंतर लोकसभेच्या केवळ दोन जागा जिंकल्या, तेव्हा तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी त्याची खिल्ली उडवली होती. पण, आता देशातील १६ राज्यांमध्ये भाजपची सरकारे आहेत आणि ४०० हून अधिक संसद सदस्य आहेत.

काॅंग्रेसचे नेते ॲंटनी यांच्या मुलाचा भाजप प्रवेश

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. अँटनी यांचा मुलगा अनिल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यासह अनेक नेते यावेळी उपस्थित हाेते. अभिव्यक्तिस्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांनी मी केलेले एक ट्वीट मागे घेण्यासाठी प्रचंड त्रास दिल्याचे अनिल यांनी काॅंग्रेसला साेडचिठ्ठी देताना सांगितले.

Web Title: Don't be overconfident about elections! PM Modi's advice to activists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.