पीडितेला अटक केल्याच्या निषेधार्थ दिल्लीत निदर्शने, चिन्मयानंद यांची पाठराखण करू नका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 05:59 AM2019-10-07T05:59:59+5:302019-10-07T06:00:43+5:30
चिन्मयानंद यांच्याकडून ५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा बलात्कार पीडितेवर आरोप आहे.
नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री चिन्मयानंद यांनी बलात्कार केल्याचा आरोप करणाऱ्या विद्यार्थिनीला खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात अटक केल्यामुळे दिल्लीतील विद्यार्थीवर्ग संतप्त झाला आहे. या अटकेच्या निषेधार्थ येथील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी शनिवारी जंतरमंतर येथे जोरदार निदर्शने केली.
चिन्मयानंद यांच्याकडून ५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा बलात्कार पीडितेवर आरोप आहे. चिन्मयानंद यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केल्यानंतर एक महिन्याने पोलिसांनी तिच्यावर ही कारवाई केली आहे. जंतरमंतर येथील निदर्शनात सहभागी झालेल्या आॅल इंडिया वूमन्स डेमोक्रॅटिक असोसिएशनच्या उपाध्यक्ष एस. पुनियावता यांनी सांगितले की, चिन्मयानंद प्रकरणात बलात्कार पीडितेला बळीचा बकरा केले जात आहे. चिन्मयानंद यांची सरकारने पाठराखण करू नये व पीडित युवतीची सुटका करावी, अशी मागणी या निदर्शकांनी केली.
जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील एक विद्यार्थिनी रेखा सिंह हिने सांगितले की, भाजप सरकारने बलात्कार प्रकरणांतील आरोपींची पाठराखण करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी कठुआ बलात्कार प्रकरणातील आरोपींना संरक्षण देण्याचा प्रयत्न सरकारने केला होता. पीपल्स डेमोक्रॅटिक स्टुडंट्स युनियनचा सदस्य जयदीप याने सांगितले की, सत्ता व पैसा असलेल्या लोकांनाच या देशात न्याय मिळतो, असे सध्या वातावरण आहे.
चिन्मयानंद यांना वाचविण्याचा प्रयत्न?
चिन्मयानंद प्रकरणातील पीडित विद्यार्थिनीला अटक करून २४ सप्टेंबर रोजी चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. आपल्या मुलीविरोधात पोलिसांकडे काहीही पुरावे नाहीत. पोलीस चिन्मयानंद यांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप पीडित विद्यार्थिनीच्या वडिलांनी केला होता.