मुलींना मोबाईल देऊ नका, बलात्काराच्या प्रश्नावर महिला आयोगाच्या सदस्यांचं अजबच उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 11:10 PM2021-06-10T23:10:56+5:302021-06-11T00:15:11+5:30
मुली या सातत्याने मोबाईलवरुन बोलताना दिसतात, त्यातूनच मॅटर तिथपर्यंत पोहोचतो, की लग्नासाठी मुली पळून जातात. त्यामुळे, मुलींकडे मोबाईल असल्यास त्या कुणाला बोलतात, काय करतात याकडे लक्ष द्यायला हवं, असे मीना कुमारी यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं.
लखनौ - उत्तर प्रदेशात बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होत असून नुकतेच अलीगढ येथे आणखी एक बलात्काराची घटना घडली आहे. राज्यातील बलात्काराच्या घटनांसंदर्भात राज्य महिला आयोगाच्या सदस्य मीना कुमारी यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना वादग्रस्त विधान कुमारी यांनी केलं आहे. मीना कुमारी यांनी मुलींच्या हालचालींवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. आपल्या मुली कुठे जातात, काय करतात याकडे पाहिलं पाहिजे असं मीना कुमारी यांनी म्हटलंय.
मुली या सातत्याने मोबाईलवरुन बोलताना दिसतात, त्यातूनच मॅटर तिथपर्यंत पोहोचतो, की लग्नासाठी मुली पळून जातात. त्यामुळे, मुलींकडे मोबाईल असल्यास त्या कुणाला बोलतात, काय करतात याकडे लक्ष द्यायला हवं, असे मीना कुमारी यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं. अलीगढसह राज्यातील बलात्कारांच्या वाढत्या घटनांबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर प्रदेशमहिला आयोगाच्या सदस्य असलेल्या मीना कुमारी यांनी अजबच उत्तर दिलंय. मीना कुमारी यांच्या या उत्तरावरुन त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे.
कालच माझ्याकडे एक मॅटर आला होता, वाल्मिकीची मुलगी आणि जाट समाजाचा मुलगा, ते माझ्याकडे आले होते. लोकांनी त्यांच्यावर दबाव टाकल्यानंतर दोघांनी लग्न केले. त्यावेळी, गावातील लोकांनी पंचायत बोलावून, आम्ही त्यांना घरात घुसू देणार नसल्याचे म्हटले. त्यामुळे, मुलींना मोबाईल देऊ नका, असे आवाहनच मीना कुमारी यांनी केले आहे. जर, देत असाल तर त्यांच्यावर लक्ष ठेवा, आईने दुर्लक्ष केल्यानंतरच मुलींची अशी अवस्था होते, असेही मीना कुमारी यांनी म्हटलं.