बकरी ईदला नमाजनंतर एकमेकांची गळाभेट घेऊ नका, उत्तर प्रदेशात फर्मान जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2017 10:55 AM2017-09-02T10:55:37+5:302017-09-02T11:00:16+5:30
उत्तर प्रदेशात बकरी ईदला नमाजनंतर एकमेकांची गळाभेट घेऊ नका असा आदेशच जारी करण्यात आला आहे
लखनऊ, दि. 2 - उत्तर प्रदेशात बकरी ईदला नमाजनंतर एकमेकांची गळाभेट घेऊ नका असा आदेशच जारी करण्यात आला आहे. पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य असलेले सुन्नी मौलाना रशीद फिरंगिमहली यांनी मुस्लिमांना हे आवाहन केलं आहे. मात्र यामागे कोणतंही धार्मिक कारण नसून राज्यात स्वाईन फ्लूचा फैलाव वाढला असल्याने पुर्वकाळजी म्हणून रशीद फिरंगिमहली यांनी हे आवाहन केलं आहे. स्वाईन फ्लूचं संकट दिवसेंदिवस वाढत असून, नमाजच्या निमित्ताने लोक एकत्र आल्याने तसंच गळाभेट घेतल्याने त्याचा फैलाव होण्याची भीती आहे असं रशीद फिरंगिमहली बोलले आहेत.
दरम्यान शिया मौलाना जव्वाद यांनी गळाभेट घेताना मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. उत्तर प्रदेशातील 75 जिल्ह्यांमध्ये स्वाईन फ्लूचे 66 रुग्ण आढळले आहेत.
मौलाना रशीद फिरंगिमहली यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे की, 'उत्तर प्रदेशमधील 20 टक्के लोकसंख्या मुस्लिम आहे. यामधील अनेकजण नमाज पठन करतात आणि एकमेकांची गळाभेट घेत असतात. हात मिळवल्याने तसंच गळाभेट घेतल्याने स्वाईन फ्लूची लागण होण्याचा धोका असतो. यामुळे आम्ही आमच्या बांधवांना गळाभेट न घेता फक्त सलाम करा असं आवाहन केलं आहे. देवालाही आपल्या भक्तांची काळजी असते. जर एखाद्या सणामुळे स्वाईन फ्लूचा फैलाव झाला तर ही खूप लाजिरवाणी गोष्ट असेल'.
ईद-उल-अधा किंवा बकरी ईद हा मुस्लिमांचा सण आहे. या दिवशी कुराणमधील बळीची घटना साजरा केली जाते. इस्लामच्या तीन मुख्य ईदपैकी हा एक दिवस आहे. या सणाला ‘ईद-उल-अज़हा’ किंवा ‘ईद-उज़-जुहा’ असेही म्हणतात. याच महिन्यात मुस्लिम लोक हज यात्रेसाठी प्रयाण करतात. मुस्लिम प्रथांनुसार ईदच्या दिवशी कोणत्याही चतुष्पाद प्राण्याचा बळी देण्यात येतो. त्यानुसार भारतात मुस्लिम बांधवांकडून बक-याची कुर्बानी दिली जाते. त्यामुळे भारतात या सणासाठी बकरी ईद हे नाव प्रचलित झाले आहे.
बकरी ईदला जनावरं कापण्याऐवजी केक कापा, RSS प्रणित मुस्लिम राष्ट्रीय मंचचं आवाहन
दुसरीकडे राष्ट्रीय स्वंयसेवक संघ (आरएसएस) प्रणित मुस्लिम राष्ट्रीय मंचनं बकरी ईदला जनावरांच्या देण्यात येणा-या बळी प्रथेला विरोध करत बकरी ईदच्या दिवशी जनावरं नाही तर केक कापा, असे आवाहन मुस्लिमांना केले आहे. मुस्लिम उलेमा मात्र मुस्लिम राष्ट्रीय मंचच्या या भूमिकेविरोधात उभी ठाकली आहे. 1400 वर्षांपासून बकरी ईदला जनावरांचा बळी देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय, धर्मामध्ये आरएसएस हस्तक्षेप करत असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. राष्ट्रीय स्वंयसेवक संघ (आरएसएस) प्रणित मुस्लिम राष्ट्रीय मंचनं बकरी ईदच्या दिवशी जनावरांचा बळी देण्याला विरोध दर्शवण्याचा निर्णय घेतला आहे.