केवळ सिनेकलावंतांच्या मागे हात धुऊन लागू नका; गृह मंत्रालयाचे एनसीबीला आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2020 03:01 AM2020-10-11T03:01:06+5:302020-10-11T06:51:27+5:30
NCP Bollywood Drugs News: अमली पदार्थांचे तस्कर, विक्रेत्यांवर कारवाई करण्याच्या सूचना
हरीश गुप्ता
नवी दिल्ली : अमली पदार्थांचे व्यसन करणाऱ्या चित्रपट अभिनेत्यांपेक्षा त्या पदार्थांचे विक्रेते व संघटित टोळीवर कारवाई करण्याकडे अधिक लक्ष द्यावे, असा आदेश केंद्र सरकारने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला (एनसीबी) दिला आहे. त्यामुळे या प्रकरणात चित्रपट कलाकारांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमधील ड्रग्ज प्रकरण समोर आले होते. आणखी काही बड्या कलाकारांना एनसीबी चौकशीस बोलाविणार असल्याचे वृत्त वृत्तवाहिन्यांवर झळकले होते. त्याचा एनसीबीने इन्कार न केल्याने कलाकारांमध्ये काहीसे घबराटीचे वातावरण होते. अमली पदार्थ प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्ती व सुशांतसिंह राजपूत याचे काही सहकारी यांच्यासह सुमारे १२ लोकांना एनसीबीने अटक केली आहे. ड्रग्ज टोळीचे सदस्य नसलेल्या व केवळ ते सेवन करत असल्याचा संशय असलेल्या कलाकारांना चौकशीच्या निमित्ताने सळो की पळो करून सोडू नये. त्यापेक्षा ड्रग्जची तस्कर, विक्री करणाऱ्यांना जेरबंद करण्यावर अधिक लक्ष द्यावे, असा आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने एनसीबीला दिला आहे.
कोणत्याही राजकीय लाभाची शक्यता नाही
सुशांतसिंहची गळा दाबून हत्या झाली नसल्याचा निर्वाळा एम्समधील डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी दिला आहे. या अभिनेत्याने आत्महत्याच केली असा निष्कर्ष गुप्ता यांनी अहवालात मांडला आहे. सुशांतच्या बँक व्यवहारांत मनी लाँडरिंगचा संबंध नसल्याचे अंमलबजावणी संचालनालयाला आढळून आले आहे. या प्रकरणामध्ये चित्रपट कलाकारांची चौकशी करून, कारवाई करून त्यातून भाजपला कोणताही राजकीय लाभ होण्याची शक्यता नसल्याचे पक्षातील काही नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कळविले आहे.