सोशल मीडिया कंपन्यांनी भारताला स्वातंत्र्य आणि लोकशाहीचे धडे देऊ नयेत, रविशंकर प्रसाद कडाडले!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 02:58 PM2021-06-20T14:58:01+5:302021-06-20T15:01:03+5:30
केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सोशल मीडिया कंपन्यांना खडेबोल सुनावले आहेत.
केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सोशल मीडिया कंपन्यांना खडेबोल सुनावले आहेत. सोशल मीडिया कंपन्यांनी भारताला लोकशाही आणि स्वातंत्र्याचे धडे देण्याचं काम करू नये, जर या कंपन्यांना भारतात राहून नफा कमवायचा असेल तर त्यांना भारतीय संविधान आणि कायदे पाळावेच लागतील, असे खडेबोल रविशंकर प्रसाद यांनी कंपन्यांना सुनावेल आहेत.
सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीद्वारे सिम्बॉयसिस सुवर्ण जयंती व्याख्यानमालेचं आयोजिन करण्यात आलं होतं. यात सोशल मीडिया आणि सामाजिक सुरक्षा व गुन्हे प्रणालीतील सुधारणा एक अपूर्ण अजेंडा या विषयावर बोलताना रविशंकर प्रसाद यांनी सोशल मीडिया कंपन्यांना काही स्पष्ट सूचना दिल्या. नवे नियम हे काही सोशल मीडियाच्या वापरासंबंधिचे नव्हे, तर या व्यासपीठाच्या चुकीच्या वापराबद्दलचे आहेत, असं रविशंकर प्रसाद म्हणाले.
"नवे नियमांचं पालन करावंच लागेल ही अतिशय पायाभूत गरज आहे. मला पुन्हा एकदा आवर्जुन सांगायचं आहे की नफा कमावणाऱ्या कंपन्या ज्या अमेरिकेत बसल्या आहेत. त्यांनी भारताला स्वातंत्र्य आणि लोकशाहीचे धडे देण्याची अजिबात गरज नाही. भारतात स्वातंत्र्यासोबतच निष्पक्ष पद्धतीनं निवडणुका होतात. आमच्या इथं न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे. मीडिया, सिवील सोसायटीलाही स्वातंत्र्य आहे. मी इथं विद्यार्थ्यांसोबत संवाद साधतोय आणि त्याच वेळी त्यांच्या प्रश्नांची देखील उत्तरं देत आहे. हीच खऱ्या अर्थानं लोकशाही आहे. त्यामुळे कंपन्यांनी आम्हाला लोकशाहीवर धडे देऊ नये", असं रविशंकर प्रसाद म्हणाले.
"जेव्हा भारतीय कंपन्या अमेरिकेत व्यापार करण्यासाठी जातात तेव्हा त्या अमेरिकेतील कायदे आणि नियम पाळत नाहीत का? भारत एक डिजिटल मार्केट आहे आणि तुम्ही इथं खूप पैसा कमावता. यात आम्हाला काहीच अडचण नाही. पंतप्रधानांवर टीका करा, माझ्यावर टीका करा, प्रश्न विचारा पण तुम्ही भारताचे कायदे का पाळणार नाही? याचं उत्तर द्या. जर तुम्हाला भारतात व्यवसाय करायचा आहे, तर भारतीय संविधान आणि कायदे पाळावेच लागतील", असं रोखठोक विधान रविशंकर प्रसाद यांनी व्यक्त केलं.