कोरोना पसरु देऊ नका, यंत्रणा सुसज्ज ठेवा : नरेंद्र माेदी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 06:53 AM2023-03-23T06:53:22+5:302023-03-23T06:53:45+5:30
मागील चोवीस तासांत देशात १३१४ नवे रुग्ण आढळले, तर सक्रिय रुग्णसंख्या ७०२६वर पोहोचली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य खात्याने दिली.
नवी दिल्ली : भारतात कोरोना रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशातील कोरोना स्थितीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी एका
बैठकीत आढावा घेतला. कोरोनाचा अधिक फैलाव होऊ नये म्हणून दक्ष राहण्याचे, तसेच कोरोना मुकाबला करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सुसज्ज राखण्याचे निर्देशही अधिकाऱ्यांना दिले.
कोरोना स्थितीचे अचूक निदान होण्यासाठी जिनोम सिक्वेन्सिंग वाढवावे, असेही आदेश पंतप्रधान मोदी यांनी दिले आहेत. देशात एच१एन१ व एच३एन२ या विषाणूंमुळे इन्फ्लुएन्झा तापाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्याची माहितीही मोदी यांनी या बैठकीत घेतली. मागील चोवीस तासांत देशात १३१४ नवे रुग्ण आढळले, तर सक्रिय रुग्णसंख्या ७०२६वर पोहोचली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य खात्याने दिली.
ठाण्यात आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू
जिल्ह्यात नव्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होण्याचे नाव घेत नाही. बुधवारी दिवसभरात ठाणे जिल्ह्यात तब्बल ७१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर ठाणे शहरात एकाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. वाढत्या रुग्णसंख्येने जिल्ह्यात सक्रिय रुग्णांचा आकडा हा ३०६ वर गेला आहे. त्यातील २०६ सक्रिय रुग्ण हे एकट्या ठाणे महापालिका हद्दीत आहेत. तर आठवडाभरात ठामपा हद्दीत कोरोनाचा तिसरा बळी गेला आहे.