Coronavirus: धीर सोडू नका! कोरोनाशी झुंजत होती आई...भावा-बहीणीने कारलाच बनविले कोरोना वॉर्ड
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 08:51 AM2021-05-04T08:51:01+5:302021-05-04T08:59:12+5:30
Coronavirus Positive story of Uttar Pradesh: 20 एप्रिलला 25 वर्षांची पायल आणि तिचा 23 वर्षांचा भाऊ आकाश लखीमपुर खीरीहून त्यांच्या आईला डायलिसीस करण्यासाठी लखनऊला घेऊन आले होते. पण कोरोना झाल्याने आणि ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्याने डायलेसिसला नकार मिळाला.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने (Corona second wave) संपूर्ण देशाला कवेत घेतले आहे. एकीकडे ऑक्सिजनचा तुटवडा (Oxygen shortage), बेड मिळत नाहीएत, दुसरीकडे रेमडेसीवीर सारख्या औषधांची टंचाई अशा अनेक संकटांशी आरोग्य व्यवस्था आणि नागरिक झुंझ देत आहेत. अशातच उत्तरप्रदेशच्या लखीमपुर खीरीमधून आलेल्या एका भावा-बहीणीने आपल्या आईला कोरोनाबाधित वाचविण्यासाठी थक्क करणारे प्रयत्न केले आहेत. आईला हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नव्हता म्हणून त्यांनी त्यांच्या कारलाच कोरोना वॉर्ड बनवून तिच्यावर यशस्वी उपचार केले आहेत. (sister brother save there mother from corona Virus; made there car as corona ward for five days.)
त्यांच्या आईला डायलेसीसची गरज होती. दोघा बहीण भावाने कारच्या छतावर ऑक्सिजन सिलिंडर ठेवून कारमध्येच आईवर उपचार सुरु केले. ते दोघे पुढील सीटवर बसले आणि मागच्या सीटचा आईसाठ बेड बनविला. अखेर पाचव्या दिवशी त्या मातेला हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध झाला. पुढील पाच दिवसांनी तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली. बहीण भावाच्या संघर्षाची कहानी एवढीच नाही. आधीचे पाच दिवस आणि नंतरचे पाच असे दहा दिवस या बहीण भावाने हॉस्पिटलच्या पार्किंगमध्येच कारमध्ये राहून दिवस काढले. या काळात भावालाही कोरोनाचे संक्रमण झाले.
20 एप्रिलला 25 वर्षांची पायल आणि तिचा 23 वर्षांचा भाऊ आकाश लखीमपुर खीरीहून त्यांच्या आईला डायलिसीस करण्यासाठी लखनऊला घेऊन आले होते. आईचा डायलिसीस झाल्यावर सायंकाळी ते घरी जातील अशा अंदाजात ते होते. मात्र, त्याच दिवशी त्यांच्या आईला ताप आला. यामुळे आरटी-पीसीआर टेस्ट करण्यात आली. कोरोनाचा संशय आल्याने त्यांनी टेस्ट केली. लखनऊमध्ये कोणा नातेवाईकाकडे किंवा हॉटेलमध्ये राहणे योग्य नव्हते. तेथीलच एका ठेल्यावरून जेवण केले आणि हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये कार उभी करून त्या रात्री तिथेच झोपले.
दुसऱ्या दिवशी आईची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. यामुळे दरवेळी जे हॉस्पिटल डायलेसिस करत होते त्यांनी डायलेसीस करण्यास नकार दिला. मित्रांच्या मदतीने एक हॉस्पिटल डायलेसीस करण्यास तयार झाले. मात्र, आईची ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्याने त्यांनीही नकार दिला. आम्ही सरकारकडे मदत मागितली, परंतू काहीच हाती लागले नाही, असे त्यांनी सांगितले.
बाहेरून 1300 रुपयांच ऑक्सिजनचे 5 कॅन मिळाले. जे काही मिनिटेच चालले. ऑक्सिजन लेव्हल सुधरल्यानंतर त्या हॉस्पिटलने डायलेसीस करण्यास होकार दिला. यानंतर कोरोनाशी लढायचे होते. 23 एप्रिलला आम्ही लखनऊमध्येच ऑक्सिजन सिलिंडर कुठे मिळतो का हे पाहत होतो. अखेर वडिलांनी लखिमपूरहून ऑक्सिजन सिलिंडर आणला. त्यांना पुन्हा माघारी पाठविले, कारण ते कोरोनापासून सुरक्षित राहतील. 24 एप्रिलला राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये बेड मिळाला. 30 एप्रिलला त्यांच्या आईला बरे झाल्याने हॉस्पिटलने सोडले. याकाळात आकाशलाही कोरोनाची लागण झाली. परंतू तो देखील आता बरा झाल्याचे पायलने सांगितले.