‘’युद्धकाळात जवानांच्या मनोधैर्यावर परिणाम होईल, अशी विधाने करू नका’’ मोदींचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2020 12:04 PM2020-07-26T12:04:28+5:302020-07-26T12:04:52+5:30
युद्धकालीन परिस्थितीमध्ये आम्ही जे काही बोलतो त्याचा सीमेवर उभ्या असलेल्या जवानांच्या आणि त्यांच्या कुटंबीयांच्या मनोधैर्यावर थेट प्रभाव पडत असतो.
नवी दिल्ली - आज देशात २१ वा कारगिल विजय दिवस साजरा होत आहे. दरम्यान, आज मन की बात च्या ६७ व्या भागात देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारगिलमधील योद्ध्यांना मानवंदना दिली. तसेच युद्धकाळातील वर्तनाबाबत देशवासियांना मोलाचा सल्ला दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बातमध्ये म्हणाले की, युद्धकालीन परिस्थितीमध्ये आम्ही जे काही बोलतो त्याचा सीमेवर उभ्या असलेल्या जवानांच्या आणि त्यांच्या कुटंबीयांच्या मनोधैर्यावर थेट प्रभाव पडत असतो. ही गोष्ट आपण विसरता कामा नये. आमचे वर्तन, आमचा व्यवहार, आमची वाणी, आमची विधाने, आमच्या मर्यादा आणि आमचे लक्ष्य या सर्वामध्ये आपण जे काही करत आहोत त्यामुळे सैनिकांचे मनोधैर्य वाढले पाहिजे. तसेच त्यांच्या सन्मान वाढला पाहिजे.
कधी कधी आम्ही एखादी गोष्ट समजून घेतल्याशिवाय सोशल मीडियावर अशा गोष्टी शेअर करतो ज्यामुळे आपल्या देशाचे खूप नुकसान होते. कधीकधी ही बाब चुकीची आहे हे माहिती असूनही केवळ कुतुहल म्हणून फॉरवर्ड केले जातात, अशी नाराजीही मोदींनी व्यक्त केली.
दरम्यान, आज मन की बात ची सुरुवात करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासीयांच्यावतीने वीर जवानांना आणि त्यांच्या मातांना नमन केले. यावेळी मोदींनी अटल बिहारी वाजपेयी यांनी १९९९ च्या कारगिल युद्धावेळी देशवासियांना महात्मा गांधींच्या सांगितलेल्या एका मंत्राची आठवण करून दिली. मोदी म्हणाले की, अटलजींनी सांगितले होते. कारगिल युद्धाने आपल्या एक दुसरा मंत्र दिला आहे. तो म्हणजे कुठलाही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी आमचे हे पाऊल त्या जवानाच्या सन्मानासाठी अनुरूप आहे का, ज्याने दुर्गम प्रदेशामध्ये आपल्या प्राणांची आहुती दिली आहे, याचा विचार आपण केला पाहिजे.