2004 ची चूक करू नका..., लोकसभा निवडणुकीपूर्वी PM मोदींची मंत्र्यांना महत्वाची सूचना; काय सांगितलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2024 02:34 PM2024-02-04T14:34:34+5:302024-02-04T14:35:04+5:30
देशातील सध्याचे वातावरण पाहता भाजप नेते ‘अब की बार 400 पार’ म्हणत आहेत. पण...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी आपल्या कॅबिनेट मंत्र्यांना महत्वाची सूचना दिला आहे. मोदी म्हणाले, मंत्र्यांनी कोणत्याही राजकीय विश्लेषकाला बळी पडू नये. आणि आगामी 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत. खरे तर, अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमामुळे संपूर्ण देशात भाजपसाठी अनुकूल वातावरण झाले असतानाच मोदींनी आपल्या मंत्र्यांना अशा प्रकारची सूचना दिली आहे.
जोवर काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत ते पूर्ण झाले असे म्हटले जाऊ शकत नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्र्यांना सांगितले आहे. खरे तर, भाजपला अजूनही 2004 ची निवडणूक लक्षात आहे. तेव्हा भाजपचे नेतृत्व शेवटच्या क्षणी काही प्रमाणावर गाफील झाले होते आणि सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भाजपपेक्षा अवघ्या सात जागांनी लोकसभेत सर्वात मोठा पक्ष बनला. एवढेच नाही तर, पुढील 10 वर्षे सत्तेत राहिला. यावेळी, काँग्रेसने यूपीए आघाडी स्थापन केली होती आणि मनमोहन सिंग सलग दोन वेळा पंतप्रधान झाले होते.
देशातील सध्याचे वातावरण पाहता भाजप नेते ‘अब की बार 400 पार’ म्हणत आहेत. मात्र, पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना या निवडणुकीच्या बाबतीत गाफील राहायचे नाही. बहुदा यामुळे भाजपने बिहारमध्ये JD(U) सोबत पुन्हा एकदा युती केली आणि ओडिशात BJD सोबत सकारात्मक वातावरण निर्माण करण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही.