ड्रग्जची नको, सोन्याची तस्करी करा, लगेच जामीन मिळेल- भाजपा आमदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 09:15 AM2018-06-01T09:15:24+5:302018-06-01T09:15:24+5:30

धक्कादायक विधानामुळे भाजपा आमदार वादात 

Dont Peddle Drugs Smuggle Gold as its Bailable says Rajasthan MLA | ड्रग्जची नको, सोन्याची तस्करी करा, लगेच जामीन मिळेल- भाजपा आमदार

ड्रग्जची नको, सोन्याची तस्करी करा, लगेच जामीन मिळेल- भाजपा आमदार

जोधपूर: अमली पदार्थांची तस्करी करु नका. त्यापेक्षा सोन्याची तस्करी करा. सोन्याची तस्करी करताना अटक झाल्यास जामीन मिळतो, असं धक्कादायक विधान भाजपचे आमदार अर्जुन लाल गर्ग यांनी केलंय. अमली पदार्थांची तस्करी हा अजामीनपत्र गुन्हा आहे. पण सोन्याची तस्करी करताना अटक झाल्यास अतिशय सहज जामीन मिळतो. त्यामुळे अमली पदार्थांची तस्करी न करता सोन्याची तस्करी करा, असं बिलाराचे आमदार अर्जुन लाल गर्ग यांनी म्हटलं. 

देवासी समुदायाकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना गर्ग यांनी बेताल वक्तव्य केलं. गर्ग यांच्या विधानाची व्हिडीओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. देवासी समुदायाला संबोधित करताना गर्ग यांनी विधानपरिषदेत उपस्थित केलेल्या प्रश्नाचा संदर्भ दिला. 'अमली पदार्थ विरोधी कायदा 1985 अंतर्गत कितीजण जोधपूरच्या तुरुंगात आहेत, असा प्रश्न मी विधानसभेत उपस्थित केला होता. त्यावेळी बिष्णोई समाजापेक्षा देवासी समुदायचे जास्त लोक तुरुंगात असल्याचं मला समजलं,' असं गर्ग म्हणाले. अमली पदार्थांच्या तस्करीमुळे होणारी शिक्षा टाळण्यासाठी त्यांनी एक धक्कादायक सल्ला यावेळी दिला. 'अमली पदार्थांची तस्करी करुन तुरुंगात जाण्यापेक्षा सोन्याची तस्करी करा. सोन्याच्या तस्करीत लवकर जामीन मिळतो,' असं गर्ग यांनी म्हटलं. 

'तुम्हाला दोन नंबरचा धंदा करायचाच असल्यास सोन्याची तस्करी करावी. अमली पदार्थ आणि सोन्याची तस्करीत सारखेच पैसे मिळतात. मात्र सोन्याची तस्करी जास्त सुरक्षित आहे,' असं अजब विधान गर्ग यांनी केलं. देवासी समाजाला सोन्याच्या तस्करी करण्याचा सल्ला दिल्यानं आमदार अर्जुन लाल गर्ग वादात सापडले आहेत. याबद्दल प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गर्ग लडाखला फिरायला गेले आहेत.
 

Web Title: Dont Peddle Drugs Smuggle Gold as its Bailable says Rajasthan MLA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.