'गरिबांच्या रेल्वेचं खासगीकरण करु नका, उद्योगपतीचं हित जोपसणार काय?'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2020 10:27 AM2020-07-07T10:27:53+5:302020-07-07T10:29:14+5:30
रेल्वे मंत्रालय आणि इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉपोर्रेशन (आयआरसीटीसी) यांच्यावतीने देशातील पहिली खासगी ट्रेन लखनऊ ते दिल्ली तेजस एक्सप्रेस धावली
नवी दिल्ली - भारतीय रेल्वेमध्ये खासगीकरणाचा वेग वाढला असून रेल्वे मंत्रालयाने १०९ मार्गावर १५१ आधुनिक ट्रेनद्वारे प्रवासी गाड्या चालविण्यासाठी खासगी कंपन्यांकडे अर्ज मागविला आहे. यातून रेल्वे विकायला सुरुवात केली जात आहे. भारतीय रेल्वेचे रूळ, रेल्वे कर्मचारी वर्ग वापरून खासगी ट्रेन चालविण्यात येत आहेत. यापुढे यात वाढ केली जाणार आहे. याविरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेतली होती. आता, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनीही रेल्वेच्या खासगीकरणावरुन सरकारला प्रश्न विचारला आहे.
रेल्वे मंत्रालय आणि इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉपोर्रेशन (आयआरसीटीसी) यांच्यावतीने देशातील पहिली खासगी ट्रेन लखनऊ ते दिल्ली तेजस एक्सप्रेस धावली. त्यानंतर देशभरात खासगी ट्रेन सुरू करण्यासाठी रेल्वे मंत्रालय आणि आयआरसीटीसीने वेग धरला. यासह आता खासगी क्षेत्रातून सुमारे ३० हजार कोटींची गुंतवणूक रेल्वेमध्ये केली जाणार आहे. यातूनच भारतीय रेल्वेच्या १०९ मार्गावर १५१ ट्रेन धावण्याची योजना आखण्यात आली आहे.
रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात येणाऱ्या या खासगीकरणाला काँग्रेस नेते आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी विरोध केला आहे. 'भारत हा विशाल, खंडप्राय देश आहे. या देशात गोरगरिबांना दूरच्या प्रवासासाठी रेल्वे एकमेव आधार. याशिवाय खिशाला परवडणारे वाहतुकीचे एकमेव साधन होय. त्यामुळं रेल्वेचे खाजगीकरण करू नका, असे नितीन राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन म्हटले आहे. तसेच, रेल्वेचे खासगीकरण केल्यानंतर ब्रिटनमधील रेल्वेसेवा पहिले 3 वर्षे अक्षरश: कोलमडून पडली होती. लोकांचे प्रचंड हाल झाले, हळू हळू ती रुळावरआली अन् आता ती चालत असली तरी वस्तुस्थिती वेगळी आहे, असे सांगत राऊत यांनी दूरगामी परिणामाकडेही लक्ष वेधले.
भारत हा विशाल, खंडप्राय देश. या देशात गोरगरिबांना दूरच्या प्रवासासाठी रेल्वे एकमेव आधार. याशिवाय खिशाला परवडणारे वाहतुकीचे साधन होय. त्यामुळं रेल्वेचे खाजगीकरण करू नका असे pic.twitter.com/SlqGpHSKh9
— Dr. Nitin Raut (@NitinRaut_INC) July 7, 2020
दरम्यान, रेल्वेच्या खासगीकरण निर्णयाचा मनसेही विरोध करत आहे. रेल्वे खासगीकरण रोखले पाहिजे. अन्यथा मनसे स्टाईलने ट्रॅकवर ऊतरून सर्व कामगार संघटना, प्रवासी संघटना सोबत घेऊन आंदोलन केले जाईल. देशाची रेल्वे खासगी कंपन्यांना विकू देणार नाही. रेल्वे कर्मचारी आणि प्रवासी यांना खासगीकरणाचा सर्वाधिक फटका बसणार आहे. यामध्ये सरकार आणि ठेकेदार यांचे साटेलोटे आहे. त्यांनी नवा धंदा सुरू केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन देत आहे. मात्र, खासगीकरण करून सरकारी नोकऱ्या गिळंकृत करत आहेत, असा आरोपही नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी केला आहे.