बॅटनं मारहाण करणारा भाजपा आमदार म्हणतो, यापुढे महात्मा गांधींच्या मार्गानं चालणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2019 03:21 PM2019-07-01T15:21:42+5:302019-07-01T15:22:50+5:30
पालिका अधिकाऱ्याला मारहाण केल्यानं आमदाराला घडला तुरुंगवास
इंदूर: पालिका प्रशासनातील अधिकाऱ्याला मारहाण करणारे भाजपा आमदार आकाश विजयवर्गीय यांनी आपल्याला त्या घटनेबद्दल पश्चाताप होत नसल्याचं म्हटलं. यापुढे महात्मा गांधींनी घालून दिलेल्या अहिंसेच्या मार्गानं चालण्याचा प्रयत्न करणार असल्याचंदेखील विजयवर्गीय पुढे म्हणाले. इंदूर महापालिकेच्या अधिकाऱ्याला बॅटनं मारहाण केल्या प्रकरणी आकाश यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. न्यायालयानं शनिवारी त्यांच्या सुटकेचे आदेश दिले.
आकाश यांनी इंदूर महापालिकेचे अधिकारी धिरेंद्र सिंग बायस यांना बॅटनं मारहाण केली होती. या घटनेचा व्हिडीओ गेल्या आठवड्यात व्हायरल झाला. धोकादायक घरं पाडू नका, अश मागणी करत आकाश यांनी बायस यांना मारहाण केली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. शनिवारी रात्री न्यायालयानं 20 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर सुटका करण्याचे आदेश दिल्यानंतर आकाश यांची रविवारी तुरुंगातून सुटका झाली.
आकाश यांच्या सुटकेवेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. आकाश यांना जामीन मिळाल्यावर त्यांच्या समर्थकांनी हवेत गोळीबार करुन आनंद साजरा केला. विशेष म्हणजे इंदूरमधील भाजपा कार्यालयासमोर हा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडीओदेखील समोर आला होता. यामध्ये गोळीबार करणाऱ्या कार्यकर्त्यासमोर विजयवर्गीय यांचे समर्थक भाजपाचा झेंडा घेऊन नाचताना दिसत होते. याशिवाय काहीजण रस्त्यावर फटाक्यांची माळ पेटवत होते. तुरुंगात वेळ चांगला गेल्याची प्रतिक्रिया त्यांनी सुटकेनंतर दिली.