तूर्तास राजीनामा नको; शपथविधीनंतर चर्चा करू, गृहमंत्री अमित शाह यांचा देवेंद्र फडणवीस यांना सबुरीचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2024 06:20 AM2024-06-08T06:20:35+5:302024-06-08T06:25:01+5:30
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पदमुक्त होऊन जनादेश यात्रा काढून पुढचे तीन महिने महाराष्ट्र पिंजून काढण्याचा मनोदय फडणवीस यांनी व्यक्त केला.
नवी दिल्ली : तूर्तास उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊ नका. त्यावर शपथविधीनंतर चर्चा करू. चार महिन्यांनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा रोडमॅप तयार करून कामाला लागा, असा निर्देशवजा सबुरीचा सल्ला भाजपश्रेष्ठी आणि माजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज देवेंद्र फडणवीस यांना दिला.
लोकसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीची जबाबदारी स्वीकारून उपमुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्याचा प्रस्ताव घेऊन दिल्लीत आलेले फडणवीस यांनी शाह यांची त्यांच्या निवासस्थानी गुरुवारी मध्यरात्रीनंतर तसेच आज सायंकाळी दुसऱ्यांदा भेट घेतली. ही चर्चा अर्धा तास चालली. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पदमुक्त होऊन जनादेश यात्रा काढून पुढचे तीन महिने महाराष्ट्र पिंजून काढण्याचा मनोदय फडणवीस यांनी व्यक्त केला.
फडणवीस आज काय बोलणार?
विधानसभा आणि विधान परिषदेतील भाजपच्या सर्व आमदारांची बैठक उद्या दुपारी मुंबईत होत आहे या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मार्गदर्शन करतील. फडणवीस हे राजीनाम्याच्या त्यांच्या प्रस्तावाबाबत पक्षश्रेष्ठींनी त्यांना काय सांगितले, याबाबतची माहिती या बैठकीत देणार आहेत.
महाजन यांचा इन्कार
फडणवीस यांच्या जागी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे उपमुख्यमंत्री होणार, असे वृत्त काही वाहिन्यांनी दिले. मात्र, महाजन यांनी त्याचा इन्कार केला. फडणवीस हेच उपमुख्यमंत्रिपदी कायम राहतील; आमचा तसाच आग्रह आहे, असे ते म्हणाले.
मध्यरात्री घेतली भेट
राजीनामा दिल्यास कार्यकर्त्यांच्या मनोबलावर परिणाम होईल, असे अमित शाह यांनी फडणवीस यांना सांगितल्याचे समजते. गुरुवारी फडणवीस यांनी मध्यरात्रीनंतर शाह यांची भेट घेतली तेव्हाही त्यांच्या प्रस्तावावर निर्णय झाला नव्हता.