‘इंडिया’ म्हणू नका, दुसरे काही बोलू...; भाजपचे नेते, प्रवक्ते, खासदारांना निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2023 06:20 AM2023-08-06T06:20:48+5:302023-08-06T06:21:01+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधकांच्या आघाडीसाठी योग्य शब्द शोधत आहेत.
संजय शर्मा
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : भाजपने विरोधकांच्या आघाडीला ‘इंडिया’ या नावाने संबोधित न करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप पक्षश्रेष्ठींनी आपले सर्व नेते, पक्ष प्रवक्ते व खासदारांना याबाबत निर्देश दिले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधकांच्या आघाडीसाठी योग्य शब्द शोधत आहेत. भाजपच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, १० ऑगस्ट रोजी पंतप्रधान अविश्वास प्रस्तावाला उत्तर देताना इंडियाचे पर्यायी नाव जाहीर करण्याची शक्यता आहे. २६ पेक्षा अधिक विरोधी पक्षांची आघाडी ‘इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुजिव्ह अलायन्स’ला ‘इंडिया’ म्हटले जात आहे.
या आघाडीबाबत म्हणजेच इंडियाबाबत कोणताही चुकीचा शब्द किंवा चुकीचे वाक्य बोलण्यात आल्यास त्याचा संबंध देशाच्या अस्मितेशी जोडला जाऊ नये, यासाठी भाजपचे खासदार, नेते व टीव्ही चॅनेलवर चर्चा करणाऱ्या प्रवक्त्यांना हा शब्द वापरण्यास मनाई केली
आहे.
पर्यायी नावाचा शोध
nपंतप्रधान नरेंद्र मोदी एनडीए खासदारांसमवेत बैठका घेत आहेत. या चर्चेतही स्वत: पंतप्रधान विरोधकांची आघाडी इंडियाला पर्यायी नाव सर्वांना विचारत आहेत.
nदोन दिवसांपूर्वी बिहारमधील एनडीए खासदारांच्या बैठकीत कुणीतरी घमंडिया हे नाव सुचवले. परंतु, ते पसंतीस उतरलेले नाही.
नाव बदलून आल्यामुळे त्यांचे पाप धुतले जाणार नाही. एखादा मुलगा शाळेत पास होत नसल्यास तो नाव बदलून आल्याने पास होणार नाही. तो नापासच होईल. यूपीएच्या नावावर कोट्यवधींचा घोटाळा आहे. त्यामुळेच २०१४ मध्ये यूपीएचे सरकार गेले होते. आता नाव बदलून आल्याने ते पवित्र होतील, असे नाही.
- जे. पी. नड्डा, अध्यक्ष, भाजप