तोच चंद्रमा नभात... उद्या दिसेल जरा वेगळा...खगोलप्रेमींसाठी ‘सुपर ब्लू मून’ पाहण्याची पर्वणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2024 05:49 AM2024-08-18T05:49:51+5:302024-08-18T06:08:11+5:30
Super Blue Moon : आकाशात चंद्राचे हे मनोहारी रूप पाहणे म्हणजे सर्वांसाठी अनोखी पर्वणी ठरणार आहे.
नवी दिल्ली : १९ ऑगस्ट रोजी संपूर्ण देशभर रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा केला जाईल. योगायोगाने याच दिवशी आकाशातील चंद्रही सर्वांत मोठा आणि अधिक तेजस्वी दिसणार आहे. यालाच ‘सुपर ब्लू मून’ असे म्हटले जाते. याला स्टर्जन मून असेही म्हटले जाते. आकाशात चंद्राचे हे मनोहारी रूप पाहणे म्हणजे सर्वांसाठी अनोखी पर्वणी ठरणार आहे.
चंद्राची पृथ्वीभोवतीची भ्रमण कक्षा लंबवर्तुळाकार असल्याने पृथ्वी व चंद्र अंतर कमी-अधिक होत असते. नेहमी हे अंतर सरासरी ३ लाख ८५ हजार किलोमीटर असते. या श्रावणी पौर्णिमेला चंद्र मकर राशीतील श्रवण या नक्षत्राजवळ रात्रभर पाहता येईल.
नेमके काय घडते?
‘ब्लू मून’ही एक खगोलीय घटना आहे. जेव्हा एकाच महिन्यात दोन पौर्णिमा असतात तेव्हा दुसऱ्या पौर्णिमेला किंवा एका हंगामात चार पौर्णिमा असतात तेव्हा तिसऱ्या पौर्णिमेला ‘ब्लू मून’ असे म्हणतात. जेव्हा चंद्र त्याच्या कक्षेत पृथ्वीच्या सर्वांत जवळ असतो तेव्हा त्याला ‘सुपरमून’ म्हणतात. या स्थितीत चंद्र सामान्य पौर्णिमेच्या चंद्रापेक्षा १४ टक्के मोठा आणि ३० टक्के अधिक तेजस्वी दिसतो.
किती वाजता पाहता येणार?
१९ ऑगस्टला रक्षाबंधनाच्या दिवशी संध्याकाळी ६:५६ वाजता चंद्रोदय होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी चंद्रास्त होईल.
रात्री ११:५५ वाजता चंद्र सर्वांत मोठा आणि तेजस्वी दिसणार आहे. त्या त्या ठिकाणचे हवामान आणि दृश्यमानता यानुसार खगोलप्रेमींना चंद्राचे ‘सुपर ब्लू मून’ हे रूप पाहता येईल. (वृत्तसंस्था)