CBI, ED पाठवू नका, जर दोषी असेन तर फाशी द्या; ममता बॅनर्जींच्या भाच्याचं भाजपाला आव्हान
By जयदीप दाभोळकर | Published: January 7, 2021 06:40 PM2021-01-07T18:40:42+5:302021-01-07T18:45:02+5:30
सात वर्षांत देशात कोणताही बदल न झाल्याचं म्हणत पंतप्रधानांवरही केली टीका
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाचा आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. जर आपण पैशांच्या गैरव्यवहाराचे दोषी आढळलो तर थेट मला फाशी द्या असं आव्हान त्यांनी भाजपाला दिलं. दक्षिण मिनाजपुर येथे एका निवडणुकीच्या सभेला संबोधित करताना त्यांनी भाजपावर हल्लाबोल केला. तसंच वेगवेगळ्या प्रकारानं मला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असून थेट माझं नाव घेतलं जात नाही असंही ते म्हणाले.
"ते माझ्यावर सातत्यानं टीका करत असतात. भाच्याला हटवा असं जबरदस्ती म्हणत असतात. मी यापूर्वीही सांगितलं होतं आणि आता कॅमेऱ्यांसमोर पुन्हा एकदा तेच सांगतोय. जर मी जबरदस्ती वसूली केल्याच्या प्रकरणात सामील आहे हे आणि मी कोणत्याही चुकीच्या कामात सहभागी आहे हे जर तुम्ही सिद्ध करू शकलात तर तुम्हाला ईडी आणि सीबीआय पाठवण्याची गरज नाही. सिद्ध झाल्यास सार्वजनिक ठिकाणी मला फाशी द्या. मी ते स्वीकारण्यास तयार आहे," असंही अभिषेक बॅनर्जी म्हणाले.
सभेला संबोधित करताना अभिषेक बॅनर्जी यांनी भाजपाच्या नेत्यांना थेट नाव घेण्याचं आव्हान दिलं. यावेळी त्यांनी भाजपाचे महासचिव कैलाश विजयवर्गीय, त्यांचा मुलगा आकाश विजयवर्गीय यांचं नाव घेत त्यांना गुंड असं संबोधलं. "माझ्याविरोधात गुन्हा दाखल करा आणि मला तुरूंगात पाठवूनच दाखवा. त्यावेळी कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं हे सिद्ध होईल," असंही ते म्हणाले.
पंतप्रधानांवरही केली टीका
यावेळी बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला. "मोदींना पंतप्रधानपदी विराजमान होऊन ७ वर्ष झाली. परंतु देशात कोणतेही बदल घडले नाहीत. स्वत: दहा लाखांचे सूट घालायला लागले आणि महागड्या गाड्यांमध्ये फिरू लागले. परंतु ममता बॅनर्जी २०११ मध्ये मुख्यमत्री बनल्यापासून आजही साध्या साडीत आणि साध्या चपलांमध्ये असतात. त्या त्याच घरात राहतात ज्या घरात त्या पूर्वी राहायच्या. त्याच गाडीत प्रवास करतात ज्या गाडीत त्या पूर्वी करायच्या," असं बॅनर्जी म्हणाले. तसंच त्यांनी जीएसटी लागू करणं आणि नोटबंदीवरूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.