हिजाब बंदीचे प्रकरण संवेदनशील बनवू नका- सर्वाेच्च न्यायालय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 06:48 AM2022-03-25T06:48:05+5:302022-03-25T06:48:51+5:30
शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी याेग्य असल्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाविराेधात सर्वाेच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली हाेती. त्यावेळी हाेळीनंतर यावर विचार करू, असे न्यायालयाने म्हटले हाेते.
नवी दिल्ली : कर्नाटकमधील हिजाबप्रकरणी सर्वाेच्च न्यायालयाने तातडीने सुनावणीस नकार दिला. प्रकरणाचा परीक्षांशी संबंध नसल्याचे स्पष्ट करून प्रकरण संवेदनशील बनवू नका, अशी तंबी सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी याचिकाकर्त्यांच्या वकिलांना दिली आहे.
शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी याेग्य असल्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाविराेधात सर्वाेच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली हाेती. त्यावेळी हाेळीनंतर यावर विचार करू, असे न्यायालयाने म्हटले हाेते. मात्र, याचिकाकर्त्यांचे वकील देवदत्त कामत यांनी परीक्षांचा मुद्दा उपस्थित करून तातडीने सुनावणी घेण्याची विनंती न्यायालयाला केली हाेती. २८ मार्चपासून परीक्षा सुरू हाेणार आहेत. विद्यार्थिनींना हिजाब घालून प्रवेश दिला नाही, तर तिचे वर्ष वाया जाईल, असा युक्तिवाद कामत यांनी केला. मात्र, ताे सर्वाेच्च न्यायालयाने फेटाळला.
परीक्षांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही
परीक्षांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. प्रकरण संवेदनशील बनवू नका, असे खडे बाेल न्या. रमणा यांनी कामत यांना सुनावले.
हिजाब घालणे ही इस्लामची आवश्यक धार्मिक प्रथा नसल्याचा निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयाने दिला हाेता.
शाळेचा गणवेश घटनात्मकरीत्या मान्य असून त्यावर विद्यार्थिनी आक्षेप घेऊ शकत नाहीत, असेही न्यायालयाने स्पष्ट केले हाेते.