जिवाची काळजी असेल तर जबाबदारी घेऊ नका; मुख्यमंत्री चन्नी यांची पंतप्रधानांवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2022 06:42 AM2022-01-09T06:42:39+5:302022-01-09T06:43:36+5:30
गृहमंत्री सुखजिंदर सिंग रंधावा यांनीही ट्वीट केले आहे की, पंजाब आता तुम्हाला माफ करणार नाही. रंधावा हे खूप आक्रमक झाले आहेत. कारण, गृहमंत्री या नात्याने त्यांच्या बरखास्तीची मागणी केली जात आहे.
- बलवंत तक्षक
लोकमत न्यूज नेटवर्क
चंदीगड : फिरोजपूरमधील पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटीवरून पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर वर नाव न घेता टीका केली. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विधानाचे उदाहरण देत त्यांनी पटेल यांचा फोटो शेअर करत ट्वीट केले की, ज्यांना कर्तव्यापेक्षा जिवाची अधिक काळजी आहे त्यांनी भारतासारख्या देशात मोठी जबाबदारी घेऊ नये.
गृहमंत्री सुखजिंदर सिंग रंधावा यांनीही ट्वीट केले आहे की, पंजाब आता तुम्हाला माफ करणार नाही. रंधावा हे खूप आक्रमक झाले आहेत. कारण, गृहमंत्री या नात्याने त्यांच्या बरखास्तीची मागणी केली जात आहे. त्यांना उत्तर देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष अश्वनी शर्मा यांनी ट्वीट केले की, काँग्रेसने पंजाबला मिळणारी भेट रोखली आहे. शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधानांच्या दौऱ्यात पंजाबला ३९,५०० कोटी खर्चाचा दिल्ली-अमृतसर-कटरा एक्स्प्रेस वे, १७०० कोटींचा अमृतसर-उना लेन रोड, ४५० कोटींचे सॅटेलाइट सेंटर, ३२५ कोटींचे कपूरथला आणि होशियारपूरमधील दोन मेडिकल कॉलेज आदी विकासकामांची भेट मिळणार होती. मात्र, पंतप्रधानांच्या सुरक्षेत त्रुटी राहिल्याने पंजाब या सर्व प्रकल्पांपासून वंचित राहिला आहे.
चार महिन्यात चौथ्या डीजीपींची नियुक्ती
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्या चार महिन्यांच्या काळात चौथ्या डीजीपींची नियुक्ती झाली आहे. चन्नी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हा दिनकर गुप्ता डीजीपी होते. त्यानंतर चन्नी यांनी इंद्र इकबाल सिंग सहोता यांची नियुक्ती केली. त्यानंतर सहोता यांना हटवून प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धूंच्या पुढाकाराने सिद्धार्थ चट्टोपाध्याय यांची नियुक्ती झाली.
या प्रकरणानंतर आता चट्टोपाध्याय यांच्या जागी व्ही. के. भावरा यांची नियुक्ती झाली आहे. ते १९८७ च्या बॅचचे आयपीएस आहेत. सध्या ते होमगार्ड विभागात होते.
चट्टोपाध्याय यांना गृह मंत्रालयाची नोटीस
पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटीवरून केंद्रीय गृह मंत्रालयाने तत्कालीन डीजीपी सिद्धार्थ चट्टोपाध्याय यांना नोटीस जारी करीत आपल्याविरुद्ध ऑल इंडिया सर्व्हिस रूलनुसार कारवाई का करण्यात येऊ नये, अशी विचारणा केली आहे.
दरम्यान, पंजाब पोलिसांनी पंतप्रधानांचा रस्ता अडविणाऱ्या निदर्शकांविरुद्ध गुन्हा दाखल करताना असे कलम लावले आहेत ज्यात केवळ २०० रुपये दंडाची तरतूद आहे. यात पंतप्रधानांचा ताफा रोखल्याचाही उल्लेख नाही. यात एसपीजी ॲक्टचाही उल्लेख केलेला नाही.