इंडिया व भारत मुद्द्यावर बोलू नका; पंतप्रधानांचा मंत्र्यांना सल्ला; संमेलनात सर्व शिस्तीत असावेत!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2023 08:45 AM2023-09-07T08:45:24+5:302023-09-07T08:49:18+5:30
सनातन धर्माला डेंग्यू आणि मलेरिया संबोधणाऱ्या आरोपांना कठोरपणे उत्तर द्या, असे पंतप्रधानांनी आपल्या मंत्र्यांना स्पष्टपणे सांगितले आहे.
- संजय शर्मा
नवी दिल्ली : सनातन धर्माच्या मुद्द्यावर, वस्तुस्थितीवर आधारित कठोरपणे उत्तर द्या; परंतु इंडिया विरूद्ध भारत या चर्चेत पडू नका, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्व मंत्र्यांना दिला.
सनातन धर्माला डेंग्यू आणि मलेरिया संबोधणाऱ्या आरोपांना कठोरपणे उत्तर द्या, असे पंतप्रधानांनी आपल्या मंत्र्यांना स्पष्टपणे सांगितले आहे. परंतु इंडिया - भारत या मुद्द्यावर ज्यांना सरकार व पक्षाने अधिकृत केले आहे, तेच मंत्री बोलतील,असेही त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, संपूर्ण बैठक होईपर्यंत सर्वांनी शिस्तीत राहावे. विनाकारण वक्तव्ये करण्यापासून दूर राहावे व भारताच्या शानदार आतिथ्यशील परंपरेने विदेशी पाहुण्यांचे मन जिंकावे.
सामान्य महिलेला निमंत्रण...
ओडिशातील भूमिया समाजातील एका ३६ वर्षीय आदिवासी शेतकरी महिलेला जी- २० परिषदेत सहभागी होण्यासाठी निमंत्रण मिळाले आहे. रैमाती घिउरिया असे या महिलेचे नाव आहे. भरड धान्यांना प्रोत्साहन
देण्यासाठी रैमाती यावेळी हजर राहणार आहे.
अवघे मंत्रिमंडळ पाहुण्यांच्या स्वागताला
१२ केंद्रीय मंत्री पाहुण्यांच्या स्वागतासाठी
४२ केंद्रीय मंत्र्यांची प्रोटोकॉल ड्युटी पाहुण्यांसमवेत
कोणाकडे कोणती जबाबदारी?
अनुराग ठाकूर : माध्यमे
एस. जयशंकर : बैठकीचे आयोजन
पीयूष गोयल : कार्यक्रम स्थळ
हरदीप सिंह पुरी : समन्वय
अमित शाह व संरक्षणमंत्री राजनाथ सिंह : कार्यक्रमाची सुरक्षा