बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे उघडले
By admin | Published: May 7, 2017 01:14 AM2017-05-07T01:14:30+5:302017-05-07T01:14:30+5:30
विधिवत पूजेनंतर भगवान बद्रीनाथ धामचे दरवाजे शनिवारी भाविकांसाठी उघडण्यात आले आणि त्यासोबत वार्षिक पवित्र चारधाम यात्रा पूर्णपणे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली / देहरादून : विधिवत पूजेनंतर भगवान बद्रीनाथ धामचे दरवाजे शनिवारी भाविकांसाठी उघडण्यात आले आणि त्यासोबत वार्षिक पवित्र चारधाम यात्रा पूर्णपणे सुरू झाली.
सकाळी ४ वाजून १५ मिनिटांनी द्वारपूजेनंतर मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले आणि कुबेरासह भगवान ब्रदीविशाल मंदिरात प्रवेशकर्ते झाले. द्वारपूजेसह दरवाजे उघडण्याचा संपूर्ण विधी मुख्य पुजाऱ्याच्या नेतृत्वाखाली झाला. बद्रीनाथ मंदिरात पूजेचे चंदन कर्नाटकहून, केशर काश्मीरहून, तर पूजेचे कापड ईशान्य भागातून आणले जाते. दरवाजे उघडल्यानंतर भाविकांनी मंदिरात प्रवेश करून भगवान बद्रीनाथाचे दर्शन घेतले. चारधाम यात्रेसाठी बद्रीनाथाचे दरवाजे उघडताना लष्कराच्या बँडने धून वाजवली.
सहा महिन्यांनंतर बद्रीनाथाचे दरवाजे उघडले तेव्हा दहा हजारांहून अधिक भाविक दर्शनासाठी उपस्थित होते. या सोहळ्यानंतर वार्षिक चारधाम यात्रेला पूर्णपणे प्रारंभ झाला. याच आठवड्यात केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले होते. हिवाळ्यात सहा महिने बंद राहिल्यानंतर केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी तेथे उपस्थित होते. त्यांनी मंदिरात विधिवत पूजा केली. (वृत्तसंस्था)
मुखर्जींनी केली पूजा
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शनिवारी बद्रीनाथ मंदिरात मंत्रोच्चारात बद्रीनाथाची पूजा केली. शनिवारी सकाळी बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले तेव्हा राष्ट्रपती तेथे उपस्थित होते. यावेळी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. तत्पूर्वी राष्ट्रपती गुजराती धर्मशाळेत आले.