माजी खासदारांसाठी नव्या संसदेचे दरवाजे बंद; प्रवेशासाठी नवीन कार्ड देणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 09:04 AM2024-07-03T09:04:01+5:302024-07-03T09:04:50+5:30

माजी खासदार हे विद्यमान खासदाराचे अतिथी म्हणून जाऊ शकतात, माजी खासदारांना आजही जुन्या संसद भवनात, ग्रंथालयात आणि संसद भवन ॲनेक्सीत प्रवेश करण्याची सुविधा आहे, मात्र माजी खासदारांना नव्या संसदेत प्रवेश करता येत नाही.

Doors of new parliament closed for former MP; A new card will be issued for admission  | माजी खासदारांसाठी नव्या संसदेचे दरवाजे बंद; प्रवेशासाठी नवीन कार्ड देणार 

माजी खासदारांसाठी नव्या संसदेचे दरवाजे बंद; प्रवेशासाठी नवीन कार्ड देणार 

संजय शर्मा

नवी दिल्ली : नव्या संसदेच्या नव्या नियमांमुळे सध्याचे आणि माजी खासदार सगळेच त्रस्त असून माजी खासदारांसाठी नव्या संसदेचे दरवाजे अजूनही उघडलेले नाहीत.  विद्यमान खासदार असो किंवा माजी खासदार; या सर्वांनाच नवीन संसदेच्या नव्या इमारतीत वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. विद्यमान खासदारांसाठी प्रवेश आणि बाहेर पडण्याचे नियम करण्यात आले आहेत. लोकसभा आणि राज्यसभेत प्रवेशासाठी स्वतंत्र दरवाजे निश्चित करण्यात आले आहेत. म्हणजेच, खासदारांसाठीही संसदेत प्रवेशाचे नियम करण्यात आले आहेत. माजी खासदारांसाठी नव्या संसदेचे दरवाजे अद्याप उघडलेले नाहीत. 

माजी खासदारांना आजही जुन्या संसद भवनात, ग्रंथालयात आणि संसद भवन ॲनेक्सीत प्रवेश करण्याची सुविधा आहे, मात्र माजी खासदारांना नव्या संसदेत प्रवेश करता येत नाही. माजी खासदारांना नवीन संसदेत जायचे असेल तर ते विद्यमान खासदारांचे अतिथी म्हणून जाऊ शकतात; तर जुन्या संसदेत कोणतेही खासदार वर्तमान किंवा माजी, हे कधीही जाऊ शकत होते. कोणताही खासदार, मग तो लोकसभा किंवा राज्यसभेचा असो; कोणत्याही गेटमधून जाऊ आणि येऊ शकत होता. 

माध्यमांसाठी एकच गेट
पूर्वी प्रसारमाध्यमांना कोणत्याही गेटमधून आत जाता येत असे; पण आता माध्यमांना एकाच गेटमधून जावे आणि यावे लागेल. 

संसदीय कर्मचारीही त्रस्त
नव्या संसदेच्या नियमांमुळे अगदी संसदीय कर्मचारीही त्रस्त आहेत. नव्या संसदेत राजकीय पक्षांना अद्याप कार्यालये देण्यात आलेली नाहीत. याचे कारण जागेचा अभाव असल्याचे सांगितले जात आहे. आताही जुन्या संसद भवनात राजकीय पक्षांची कार्यालये सुरू आहेत. 

माजी खासदारांना प्रवेशासाठी नवीन कार्ड देणार 
२८ मे २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संसदेचे लोकार्पण केले. तेव्हापासून नवीन संसदेत नवीन नियम लागू करण्यात आले. 
माजी खासदारांनाही नव्या संसदेत प्रवेश मिळावा यासाठी लवकरच नियम बनवले जातील, असे संसदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. माजी खासदारांना प्रवेशासाठी नवीन कार्ड दिले जातील.

Web Title: Doors of new parliament closed for former MP; A new card will be issued for admission 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.