असे आरोप करणाऱ्यांची डोप टेस्ट करा, संजय राऊत यांनी केली मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 03:10 PM2020-09-15T15:10:23+5:302020-09-15T15:11:40+5:30
ड्र्ग्सवरून भाजपा खासदार रवि किशन यांनी बॉलिवूडवर सनसनाटी आरोप केले होते. त्यानंतर जया बच्चन यांनी हे बॉलिवूडला छडयंत्र असल्याचा आरोप केला होता.
नवी दिल्ली - सध्या गाजत असलेल्या बॉलिवूडमधील ड्र्ग्स रॅकेटचे पडसाद संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही उमटले आहेत. ड्र्ग्सवरून भाजपा खासदार रवि किशन यांनी बॉलिवूडवर सनसनाटी आरोप केले होते. त्यानंतर जया बच्चन यांनी हे बॉलिवूडला छडयंत्र असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देत जया बच्चन यांना पाठिंबा दिला आहे. तसेच ड्रग्सवरून बॉलिवूडवर आरोप करणाऱ्यांची डोप टेस्ट झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे.
संजय राऊत म्हणाले की, जया बच्चन यांनी केलेले विधान अगदी योग्य आहे. कंगना राणौत हिने जे विधान केले आहे त्यावर बच्चन कुटुंबीय प्रतिक्रिया देऊ शकते. कंगना राणौत आदित्य ठाकरेंवर जे काही आरोप करत आहे त्याचे पुरावे तिने गृहमंत्रालय, गृहसचिव आणि तपास यंत्रणांना दिले पाहिजेत. या प्रकरणावरून जे लोक प्रश्न उपस्थित करत आहेत त्यांचीच पहिल्यांना डोप टेस्ट झाली पाहिजे.
जर आंतरराष्ट्रीय मार्गांनी ड्रग्स येत असेल तर ती केंद्र आणि केंद्रीय तपास यंत्रणांची जबाबदारी आहे. कुठल्याही क्षेत्रात काही वाईट लोक आहेत. याचा अर्थ ते संपूर्ण क्षेत्र वाईट आहे, असा होत नाही, असे राऊत यांनी सांगितले.
दरम्यान, जया बच्चन यांनी राज्यसभेत केलेल्या विधानाला प्रियांका चतुर्वेदी यांनीही पाठिंबा दिला आहे. जया बच्चन या बरोबर बोलल्या. त्यांनी चित्रपट सृष्टीत काम केलेले आहे. त्यामुळे त्या या क्षेत्राच्या समर्थनासाठी पुढे आल्या आहेत. चित्रपटसृष्टी देशाची शक्ती आहे, त्यामुळे तिला बदनाम करणे योग्य नाही, असे त्या म्हणाल्या.
हे बॉलिवूडला बदनाम करण्याचं षडयंत्र
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर बॉलिवूडवर घराणेशाहीचा आरोप झाला. त्यानंतर अभिनेत्री कंगना राणौत हिनं बॉलिवूड माफिया आणि ड्रग्स कनेक्शन हा मुद्दा ऐरणीवर आणला. अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह आतापर्यंत १० पेक्षा अधिक जणांना एनसीबीने ड्रग्स प्रकरणात अटक केली आहे. त्यामुळे बॉलिवूड आणि ड्रग्स यांचं कनेक्शन आता उघड होऊ लागलं आहे. मात्र बॉलिवूडला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे असा आरोप खासदार जया बच्चन यांनी केला. याबाबत राज्यसभेत जया बच्चन म्हणाल्या की, बॉलिवूडला बदनाम करण्याचा डाव रचला जात आहे. मनोरंजन क्षेत्र दिवसाला ५ लाख लोकांना रोजगार देते. देशाची आर्थिक स्थिती बिकट आहे आणि अन्य गोष्टींपासून लक्ष हटवण्यासाठी बॉलिवूडचा वापर केला जात आहे. सोशल मीडियात बॉलिवूडला निशाणा बनवला जात आहे. आम्हाला सरकारकडून समर्थन मिळत नाही. ज्या लोकांना या फिल्म इंडस्ट्रीजने नाव दिलं आज तेच बॉलिवूडला गटार संबोधत आहेत मी याचं समर्थन करणार नाही असं त्यांनी सांगितले.
खासदार रवी किशन लोकसभेत काय म्हणाले होते?
एकीकडे सुशांतसिंह मृत्यू प्रकरणाच्या तपासाला वेगळीच दिशी मिळाली असून ड्रग्ज तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यामध्ये बॉलिवूड कलाकारांचा सहभाग असल्याची चर्चा सुरू असून अधिक तपास सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर अभिनेता आणि खासदार रवी किशन यांनी सभागृहात हा मुद्दा उचलून धरला. देशात पाकिस्तान व चीनमधून नशिल्या पदार्थांची तस्करी होत आहे. देशातील तरुण पीढीला उदध्वस्त करण्याचा हा डाव असल्याचे सांगत याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी रवि किशन यांनी केली आहे. बॉलिवूड किंवा फिल्म इंडस्ट्रीत ड्रग्ज रॅकेटचा शिरकाव झाल्याचे सांगत, एनसीबीकडून तपास सुरू असल्याचेही ते म्हणाले. मात्र, याप्रकरणी कडक कारवाई करण्यात यावी, असेही खासदार रवी किशन यांनी म्हटले.
बॉलिवूड आणि ड्रग्स कनेक्शन
रिया चक्रवर्तीच्या ड्रग्स स्टोरीमध्ये सारा अली खानोबत बॉलिवूडमधील ४ मोठी नावे समोर आली आहेत. यांची नावे ड्रग्स कनेक्शनमध्ये जुळले आहेत. रियाने या तीन लोकांची नावे ठउइ ला सांगितली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठउइ या पाच लोकांवर लवकरच कारवाई करण्याच्या तयारीत आहेत.
टाइम्स नाउकडे रिया चक्रवर्तीने दिलेल्या तीन नावांची माहिती आहे. एनसीबीसमोर रियाने जी नावे घेतली त्यात अभिनेत्री सारा अली खान, रकुलप्रीत सिंह आणि डिझायनर सिमोन खंबाटा यांच्या नावांचा समावेश आहे. त्यामुळे हे स्पष्ट आहे की, एनसीबी यांच्या विरोधात पुरावे जमा करतील आणि त्यांना समन्स पाठवेल.