धोतरामुळे न्यायाधीशाला क्लबमध्ये प्रवेश नाकारला
By Admin | Published: July 14, 2014 12:35 AM2014-07-14T00:35:53+5:302014-07-14T00:35:53+5:30
मद्रास उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला केवळ धोतर नेसलेले असल्यामुळे तामिळनाडू क्रिकेट संघाच्या क्लबमध्ये प्रवेश नाकारल्याची घटना उघडकीस आल्याने तीव्र पडसाद उमटत आहेत़
चेन्नई : मद्रास उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला केवळ धोतर नेसलेले असल्यामुळे तामिळनाडू क्रिकेट संघाच्या क्लबमध्ये प्रवेश नाकारल्याची घटना उघडकीस आल्याने तीव्र पडसाद उमटत आहेत़ द्रमुक, माकप आणि तामिळनाडू काँग्रेस यावर तीव्र टीका केली असून ही घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे़
धोतर नेसून गेलेली व्यक्ती कोण, हे महत्त्वाचे नाही़; पण केवळ या कारणामुळे क्लबमध्ये या न्यायमूर्तींना प्रवेश नाकारणे अस्वीकार्य आहे़ पारंपरिक पोशाख घालून गेलेल्या व्यक्तीला प्रवेश नाकारणे दुर्दैवी असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे़ द्रमुक प्रमुख एम़ करुणानिधी यांनीही याबाबत संताप व्यक्त केला आहे़ वेती (धोतर) हे तामिळ संस्कृतीचे प्रतीक आहे़ आपला पारंपरिक पोशाख परिधान करून एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमाला जाणे, यात काहीही गैर नाही़ केवळ त्यासाठी कुणालाही प्रवेश नाकारला जाऊ शकत नाही, असे करुणानिधी म्हणाले़ माकपानेही हा मुद्दा राज्य विधानसभेत उचलण्याचा निर्णय घेतला आहे़ मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या़ डी़ हरिपरंथम काही दिवसांपूर्वी धोतर नेसून तामिळनाडू क्रिकेट क्लबमधील एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी गेले होते़ (वृत्तसंस्था)