आंध्रात ‘मनोरंजनाचा डबल धमाका’
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 04:34 AM2019-03-15T04:34:09+5:302019-03-15T04:34:24+5:30
शेती, बेरोजगारी, भाववाढ हे मुद्दे बनणार प्रचाराचे केंद्रबिंदू
- समीर इनामदार
लोकसभेच्या निवडणुकांबरोबरच विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा झाल्याने यावर्षी आंध्र प्रदेशात मनोरंजनाचा डबल धमाका अनुभवास मिळणार आहे. गेल्या काही आठवड्यांपासून मतदारांची नावे गायब होण्याबरोबरच ‘डाटा’ चोरीच्या तक्रारीपासून याची सुरुवात झाली आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आंध्र प्रदेशातील २५ लोकसभा आणि १७५ विधानसभांच्या जागांवर निवडणूक होणार असल्याची घोषणा केली. आंध्र प्रदेशात पहिल्याच टप्प्यामध्ये एकाच वेळी म्हणजे ११ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. आंध्र प्रदेश विधानसभेचा कालावधी एप्रिल आणि मे दरम्यान पूर्ण होत आहे. शेती, बेरोजगारी, भाववाढ हे आंध्र प्रदेशातील मुख्य मुद्दे आहेत.
तेलुगू देसम पार्टी आणि वायएसआर काँग्रेस यांच्यात यावर्षी जोरदार टक्कर होण्याची चिन्हे आहेत. १५ व्या विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर आंध्र प्रदेशात हालचाली वेगात सुरू झाल्या आहेत. आंध्र प्रदेशात विधानसभेच्या १७५ जागा आहेत. ९९ जागांसह तेलुगू देसम पक्ष सध्या सत्तेत आहे. २०१४ साली तेलंगणा या वेगळ्या राज्याची घोषणा झाल्यानंतर चंद्राबाबू नायडू हे नव्या आंध्र प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री बनले होते. अर्थात यापूर्वी त्यांनी १९९४ ते २००४ इतक्या वर्षांपर्यंत राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविले आहेत. आंध्र प्रदेशात सर्वाधिक काळ राहणारे मुख्यमंत्री म्हणून चंद्राबाबूंची ओळख आहे. नुकत्याच झालेल्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत तेलुगू देसम पक्ष आणि काँग्रेस यांची युती होती. मात्र या युतीला मोठा फटका बसल्याने आंध्र प्रदेश निवडणुकीत ‘काँग्रेसने एकला चलो रे’चा नारा दिला आहे. विधानसभेच्या १७५ आणि लोकसभेच्या २५ जागांवर काँग्रेस आपले उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा काँग्रेस नेते ओमान चंडी यांनी केली होती.
जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेस पक्षाला विधानसभेत ६६ जागा मिळाल्या आहेत. गेल्या १४ महिन्यांत जगनमोहन यांनी ३,६४८ कि. मी. पदयात्रा काढली होती. ‘निन्नू नम्मम बाबू’ अर्थात आमचा तुमच्यावर विश्वास नाही, बाबू अशा घोषणा देण्यात आल्या होत्या.
सिनेअभिनेते पवन कल्याण यांच्या जन सेना पार्टीनेही निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. भाजपचीही स्थिती फारशी चांगली नाही. २०१४ साली आंध्र प्रदेशात लोकसभेच्या ४२ जागा होत्या. त्यातील तेलुगू देसम पक्षाने १६, तेलंगणा राष्टÑ समितीने ११, वायएसआर काँग्रेसने ९, भाजपने तीन आणि काँग्रेसने दोन जागा जिंकल्या होत्या.
मतदारांची माहिती चोरल्याप्रकरणी आंध्र प्रदेशात सध्या घमासान माजले आहे. आंध्र प्रदेश सरकारचा ‘डाटा’ चोरीस गेल्याप्रकरणी व्हिसल ब्लोअरने आरोप केला होता की, आयटी ग्रीड्स (इंडिया) प्रा. लि. या कंपनीकडे ३.७ कोटी मतदारांचे आधार कार्ड क्रमांक, मोबाईल फोन क्रमांक, रेशन कार्डबाबत अवैधरित्या माहिती उपलब्ध आहे. याबाबत सर्वच पक्षांनी एकमेकांविरुद्ध आरोप केले होते.
लाखो मतदारांची नावे गायब
या निवडणुकीत अनेकांची नावे मतदार यादीतून गायब आहेत. ज्यांची नावे मतदार यादीतून गायब आहेत त्यांनी फॉर्म ७ भरून द्यायचा होता. ७,२४,९१४ जणांनी हा फॉर्म भरून दिला. त्यापैकी ५,२५,९५७ जणांच्या तक्रारी फेटाळण्यात आल्या तर १,५८,१२४ जणांबाबत अद्याप निर्णय झाला नाही. भाजप आणि वायएसआर काँग्रेसने याबाबत तक्रारी केल्या होत्या.