एकाच दिवसांत मोदी सरकारसाठी दुहेरी आनंदाची बातमी; शेअर बाजारावर होणार परिणाम?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 06:34 PM2022-11-14T18:34:36+5:302022-11-14T18:34:53+5:30
महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्यांना एका दिवसात दुहेरी आनंद मिळाला आहे.
नवी दिल्ली - देशात महागाईनं दिर्घकाळ उच्चांक गाठलेला असताना ती रोखण्याची सरकार आणि रिझर्व्ह बँकेचे सर्व प्रयत्न फोल ठरल्याचं दिसत होतं. पण ऑक्टोबरमध्ये आलेल्या महागाई दराच्या आकडेवारीने देशवासीयांसह केंद्रातील मोदी सरकारसाठी दुहेरी आनंदाची बातमी आणली आहे. देशातील घाऊक महागाई २.३१ टक्क्यांनी घटली, सोमवारी सकाळी पहिली चांगली बातमी आली त्यानंतर, संध्याकाळी दुसरी चांगली बातमी आली, जेव्हा किरकोळ महागाईचा दरही दीर्घ कालावधीनंतर ७ टक्क्यांच्या खाली आला आहे.
किरकोळ महागाई ७ टक्क्यांच्या खाली
देशातील किरकोळ महागाई दर सलग आठ महिने रिझर्व्ह बँकेने ठरवून दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त राहिला, सर्व प्रयत्नांनंतरही ते ७ टक्क्यांच्या खाली आणणे शक्य झाले नाही. यासाठी सरकार आणि आरबीआय सातत्याने प्रयत्न करत होते. आता त्यांचे प्रयत्न यशस्वी होताना दिसत आहेत. ऑक्टोबरच्या आकडेवारीनं दिलासादायक बातमी आली आणि बऱ्याच काळानंतर CPI (Retail Inflation) अखेर ७ टक्क्यांच्या खाली आली. सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर २०२२ मध्ये किरकोळ चलनवाढीचा दर ६.७७ टक्क्यांवर आला आहे. यापूर्वी सप्टेंबर महिन्यात हा आकडा ७.४१ टक्के होता.
महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्यांना एका दिवसात दुहेरी आनंद मिळाला आहे. ऑक्टोबरमधील किरकोळ महागाईचा हा आकडा दिलासा देणारा असला तरी तो अजूनही आरबीआयने ठरवून दिलेल्या लक्ष्यापेक्षा जास्त आहे. सरकारी आकडेवारीनुसार, ऑक्टोबरमध्ये खाद्यपदार्थांच्या महागाईचा दर ७.०१ टक्क्यांवर आला आहे.
घाऊक महागाईत मोठी घसरण
सोमवारी सकाळी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने ऑक्टोबर महिन्याची घाऊक महागाईची आकडेवारी जाहीर केली होती. घाऊक महागाईचा दर सप्टेंबरमध्ये १०.७० टक्क्यांवरून ऑक्टोबरमध्ये ८.३९ टक्क्यांवर घसरला. प्रदीर्घ काळानंतर घाऊक महागाईचा दर दुहेरीवरून एक अंकावर आला आहे. सरकारी आकडेवारीनुसार, घाऊक महागाईचा दर मार्च २०२१ नंतर प्रथमच दुहेरी अंकांच्या खाली आला आहे. घाऊक महागाई सलग १८ महिने दुहेरी अंकात होती.
शेअर बाजारावर होणार परिणाम
ऑक्टोबरमध्ये देशात सातत्याने वाढणाऱ्या महागाई दरातून दिलासा मिळाल्याचा परिणाम मंगळवारी देशांतर्गत शेअर बाजारांवरही दिसून येण्याची शक्यता आहे. महागाई कमी झाल्याच्या बातम्यांमुळे शेअर बाजारात तेजी दिसण्याची शक्यता आहे.