संसदेच्या उपाहारगृहात अखेर दुप्पट दरवाढ

By admin | Published: January 2, 2016 08:36 AM2016-01-02T08:36:28+5:302016-01-02T08:36:28+5:30

खाद्यपदार्थांवरील फार मोठ्या सबसिडीमुळे वादात अडकलेल्या संसदेच्या उपाहारगृहात नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून दुप्पट दरवाढ करण्यात आली आहे.

Double tariff in the Parliament House | संसदेच्या उपाहारगृहात अखेर दुप्पट दरवाढ

संसदेच्या उपाहारगृहात अखेर दुप्पट दरवाढ

Next

नवी दिल्ली : खाद्यपदार्थांवरील फार मोठ्या सबसिडीमुळे वादात अडकलेल्या संसदेच्या उपाहारगृहात नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून दुप्पट दरवाढ करण्यात आली आहे. यापुढे ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर हे उपाहारगृह चालविण्यात येणार असल्याचे लोकसभा सचिवालयाने स्पष्ट केले आहे.
नव्या निर्णयानुसार आतापर्यत केवळ १८ रुपयात मिळणाऱ्या शाकाहारी थाळीची किंमत वाढवून ३० रुपये करण्यात आली आहे तर ३३ रुपयांची मांसाहारी थाळी आता ६० रुपयांना मिळेल. ‘थ्री कोर्स मिल’ चे दर ६१ रुपयांवरून ९० रुपये एवढे वाढविण्यात आले आहेत. (वृत्तसंस्था)


यापूर्वी २९ रुपयांना मिळणाऱ्या चिकन करीसाठी ४० रुपये मोजावे लागतील आणि १० रुपयांना मिळणारा डाळभातही २५ रुपयांवर पोहोचला आहे.
पोळी आणि चहासारख्या काही पदार्थांच्या किमतीत मात्र बदल झालेला नाही. उपाहारगृहात दरवाढीसोबतच खाद्यपदार्थांची संख्याही कमी करण्यात आली आहे. यापूर्वी येथे दररोज १२५ ते १३० खाद्यपदार्थ तयार होत असत. परंतु यापुढे फक्त २५ पदार्थ मिळतील. तूर्तास येथे पोळ्यांचे अनेक प्रकार, पुलाव, साधा भात, खिचडी, दहीभात आणि बिर्याणी वाढली जाते. दुसरे म्हणजे उपाहारगृहातील कर्मचाऱ्यांचे कामाचे ओझे कमी करण्याच्या दृष्टीने चहा आणि कॉफीच्या मशीन्सही लावल्या जातील.
लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी खाद्यपदार्थांवरील सबसिडी कमी करण्याचे आदेश दिले होते. (वृत्तसंस्था)

सहा वर्षांनी दरवाढ
लोकसभा सचिवालयाने यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, सहा वर्षांनंतर ही दरवाढ झाली आहे. यापूर्वी २०१० साली उपाहारगृहातील पदार्थांच्या किमती वाढविण्यात आल्या होत्या आणि पुढेही वेळोवेळी याबाबत आढावा घेतला जाईल.
आकाशाला भिडणाऱ्या महागाईनंतरही संसदेच्या उपाहारगृहात नाममात्र दरात खाद्यपदार्थ दिले जात असल्याने वाद निर्माण झाला होता. विशेषत: प्रसिद्धी माध्यमांनी वेळोवेळी याकडे लक्ष वेधले होते. सचिवालयाच्या सांगण्यानुसार सुमित्रा महाजन यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांचा समावेश असलेल्या आहार व्यवस्थापन समितीला या दरांचा आढावा घेण्यास सांगितले होते.
या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर उपरोक्त निर्णय घेण्यात आले. ही नवी दरवाढ खासदार, लोकसभा व राज्यसभेचे अधिकारी, माध्यमांचे प्रतिनिधी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांसोबत कामकाज बघण्यासाठी येणाऱ्या लोकांनाही लागू असेल.

- केंद्रात भाजपाप्रणीत रालोआ सरकार सत्तारूढ झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या उपाहारगृहात अवघ्या २९ रुपयात भोजन केले होते.

असे असतील नवे दर
शाकाहारी थाळी- ३० रुपये
मांसाहारी थाळी- ६० रुपये
थ्री कोर्स मिल- ९० रुपये
चिकन कटलेट -३५ रु पये
उपमा,पोहे, इडली,डोसा- १५ रु पये

Web Title: Double tariff in the Parliament House

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.