तात्काळ तिकीटांमध्ये दुप्पट दरवाढ
By admin | Published: July 21, 2014 12:53 PM2014-07-21T12:53:38+5:302014-07-21T12:54:13+5:30
गेल्या महिन्यात घसघशीत भाडेवाढ करणा-या रेल्वेने आता तात्काळ आरक्षणात लहान अंतरासाठी छुपी दरवाढ केली आहे.
Next
ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २१ - गेल्या महिन्यात रेल्वेच्या प्रवासी भाड्यात १४. २ टक्क्यांनी वाढ केली असतानाच आता रेल्वेने तात्काळ तिकीटांच्या दरातही छुपी दरवाढ केली आहे. रेल्वेने तात्काळ तिकीटांमध्ये किमान अंतर ३०० किलोमीटरवरुन ५०० किलोमीटरवर नेल्याने लहान अंतरासाठी तात्काळ तिकीट काढणा-या प्रवाशांना दुप्पट पैसे मोजावे लागत आहे.
रेल्वे तोट्यात असल्याने गेल्या महिन्यात नवनियुक्त रेल्वे मंत्र्यांनी रेल्वेच्या प्रवासी भाड्यात तब्बल १४.२ टक्क्यांची घसघशीत भाडेवाढ केली होती. गेल्या काही दिवसांपासून सोशल नेटवर्किंग साईट्सवर तात्काळ आरक्षणाच्या दराविषयी असंख्य तक्रारी येत होत्या. अखेर रेल्वेच्या अधिका-यांनी तात्काळ तिकीटांच्या भाडेवाढीविषयी स्पष्टीकरण दिले आहे. पूर्वी तात्काळ रिझर्वेशन करताना लहान अंतरासाठी प्रवास करणा-या प्रवाशांना किमान ३०० किलोमीटरपर्यंतच्या अंतराचे पैसे मोजावे लागत होते. आता त्यांना ५०० किलोमीटरनुसार पैसे मोजावे लागतील.
उदाहरणार्थ एखाद्या प्रवाशाला फक्त २०० किलोमीटरचा प्रवास करायचा आहे. पण तात्काळ आरक्षण काढताना त्या प्रवाशाला यापूर्वी ३०० किलोमीटरपर्यंतचे पैसे मोजावे लागत होते. आता मात्र त्या प्रवाशाला तब्बल ५०० किलोमीटरच्या अंतराचे पैसे मोजावे लागतील. यामुळे त्या प्रवाशाच्या तिकीटाच्या दरात तब्बल ७५ टक्क्यांहून अधिक दरवाढ होणार आहे. त्यामुळे याचा फटका प्रामुख्याने लहान अंतरासाठी प्रवास करणा-या प्रवाशांना बसला आहे. रेल्वेने या दरवाढीची अधिकृत घोषणा न केल्याने प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.