काचेवर फास्टॅग नसल्यास दुप्पट टाेल; ‘एनएचएआय’च्या मार्गदर्शक सूचना; प्रवासातील विलंब टळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 05:58 AM2024-07-19T05:58:49+5:302024-07-19T05:59:02+5:30
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) यासंदर्भात नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
नवी दिल्ली : महामार्गांवर अनेक वाहनचालक जाणूनबुजून वाहनांवर फास्टॅगचे स्टीकर लावत नाहीत. अशा वाहनचालकांकडून दुप्पट टाेल आकारण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) यासंदर्भात नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
‘एनएचएआय’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, काही जण मुद्दामहून वाहनांच्या समाेरील काचेवर फास्टॅग स्टिकर चिकटवत नाहीत. त्यामुळे टाेल नाक्यांवर विनाकारण इतर वाहनांना विलंब हाेताे. त्यामुळे टाेल संकलन करणाऱ्या संस्थांना मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. समाेरच्या काचेवर फास्टॅग स्टिकर नसेल तर अशा वाहनचालकांकडून दुप्पट टाेल वसूल करावा, असे त्यात म्हटले आहे. असे फास्टॅग ‘ब्लॅकलिस्ट’देखील केले जाऊ शकतात. फास्टॅग नसलेल्या वाहनांचा नाेंदणी क्रमांक तसेच टाेल नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजदेखील जतन करून ठेवण्यात येणार आहे.
टाेलवर लावणार सूचना
प्रत्येक टाेल नाक्यावर या नियमांची माहिती प्रदर्शित करण्यात येणार आहे. टाेल मार्गावर जाणाऱ्या वाहनांना या दंडाबाबत स्पष्ट माहिती त्यातून देण्यात येईल.
बॅंकांनाही सूचना
फास्टॅग विकणाऱ्या बॅंकांनादेखील यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. वाहनचालकांनी फास्टॅग समाेरच्या काचेवर लावला की नाही, याबाबत त्यांनी खातरजमा करावी.
१,००० पेक्षा जास्त टाेल नाके राष्ट्रीय महामार्गांवर आहेत.
८ काेटींपेक्षा जास्त वाहनांवर फास्टॅग लावण्यात आले आहेत.