निवृत्त लष्करी अधिका-याच्या नागरिकत्वावर शंका, १९७१ मध्ये भारतात प्रवेश केल्याचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 02:28 AM2017-10-02T02:28:13+5:302017-10-02T02:28:19+5:30
संरक्षण दलातून निवृत्त झालेले ज्युनियर कमिशन्ड आॅफिसर मोहम्मद अझमल हक यांनी मला विदेशी लवादाकडून आलेल्या नोटिशीत मी बेकायदा बांगलादेशी स्थलांतरित असून
गुवाहाटी : संरक्षण दलातून निवृत्त झालेले ज्युनियर कमिशन्ड आॅफिसर मोहम्मद अझमल हक यांनी मला विदेशी लवादाकडून आलेल्या नोटिशीत मी बेकायदा बांगलादेशी स्थलांतरित असून, भारतीय नागरिक असल्याचे सिद्ध करण्यास सांगितल्याचा दावा केला आहे.
आसाममध्ये वास्तव्यास असलेले हक ३० सप्टेंबर, २०१६ रोजी निवृत्त झाले. ते शनिवारी वार्ताहरांशी बोलताना म्हणाले की, ‘मला मिळालेल्या नोटिशीमुळे संशयास्पद मतदारांच्या यादीत मला ठेवले गेले आहे. योग्य दस्तावेजाशिवाय १९७१ मध्ये भारतात प्रवेश केल्याचा आरोपही माझ्यावर ठेवला गेला आहे.’
‘मी भारतीय लष्करात ३० वर्षे सेवा केली. मला माझे भारतीय नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी १३ आॅक्टोबर रोजी स्थानिक लवादापुढे संबंधित दस्तावेजासह हजर राहण्यास या नोटिशीद्वारे सांगण्यात आले आहे. ११ सप्टेंबर रोजी मला लवादापुढे हजर राहण्यास सांगितले गेले होते, परंतु ती नोटीस मला त्याच तारखेनंतर मिळाली,’ असे हक म्हणाले. मी १३ आॅक्टोबरला हजर राहणार आहे. हक म्हणाले की, ‘मी संशयास्पद मतदारांच्या यादीत असल्याबद्दल मला २०१२ मध्येदेखील नोटीस मिळाली होती, परंतु मी लवाद न्यायालयापुढे सगळी कागदपत्रे सादर केल्यानंतर लवादाने मला भारतीय नागरिक असल्याचे जाहीर केले होते. अनेक वेळा मला का अपमानित केले जात आहे? माझी पंतप्रधान, राष्ट्रपती आणि गृहमंत्र्यांना विनंती आहे की, एका नागरिकाचा हा छळ थांबवा. अशी नोटीस आलेला मी काही माझ्या कुटुंबात पहिलाच नाही, तर २०१२ मध्ये माझी पत्नी ममताज बेगम हिलादेखील लवाद न्यायालयाने तिचे भारतीय नागरिकत्व सिद्ध करण्यास बोलावले होते.’
हा विषय वकील अमन वदूद यांनी लष्कराच्या निदर्शनास टिष्ट्वटरद्वारे आणून दिला आहे. त्यावर मेजर डी. पी. सिंग यांनी हक यांना आवश्यक ते साह्य केले जाईल, असे सांगितले.