पंतप्रधान मोदींना दत्तक घेण्यासाठी दाम्पत्याची धडपड
By admin | Published: February 22, 2017 10:10 AM2017-02-22T10:10:30+5:302017-02-22T10:38:49+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'उत्तर प्रदेशाचा दत्तक पुत्र' या विधानावरुन गोंधळ सुरू असताना गाजियाबादमधील नागरिकांनी मोदींना दत्तक घेण्याची तयारी सुरू केली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
गाजियाबाद, दि. 22 - उत्तर प्रदेशातील बाराबांकी येथील जाहीर सभेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'उत्तर प्रदेशाचा दत्तक पुत्र' या विधानावरुन गोंधळ सुरू असताना गाजियाबादमधील नागरिकांनी मोदींना दत्तक घेण्याची तयारी सुरू केली आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे येथील रहिवासी आणि पताला निवाडीतील माजी अध्यक्ष योगेंद्र पाल योग मंगळवारी पत्नीसोबत रजिस्ट्रार कार्यालयात पोहोचले आणि त्यांनी पंतप्रधान मोदी यांनी दत्तक घेण्यासाठी अर्जदेखील दाखल केला. यावेळी, दत्तक देणारा पक्ष उपस्थित नसताना दत्तक घेण्याची प्रक्रिया होणे शक्य नाही, असे तेथील अधिका-याने योग दाम्पत्याला सांगितले.
काय आहे नेमके प्रकरण?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकांच्या प्रचारावेळी बाराबांकीमधील प्रचार सभेत जनतेला संबोधित करताना म्हटले होते की, जे विकास कार्य उत्तर प्रदेशाचा मुलगा (अखिलेश यादव) करुन शकला नाही, ते काम त्यांचा दत्तक पुत्र (पंतप्रधान नरेंद्र मोदी) करेल. यानंतर उत्तर प्रदेशआतील बाल अधिकार संरक्षण आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नोटीस पाठवली. या नोटीसद्वारे आयोगाने त्यांना विचारले की 'उत्तर प्रदेशात कुणी तुम्हाला दत्तक घेतले आहे?'.
आयोगाच्या या नोटीसनंतर योगेंद्र पाल योगी यांनी घोषणा केली होती की, ते मोदींना दत्तक घेऊन त्यांचा दत्तक पुत्र म्हणून स्वीकार करतील. त्यानुसार त्यांनी पद्धतशीरपणे दत्तक घेण्यासाठीचा अर्ज तयार केला आणि मंगळवारी पत्नीसोबत त्याची नोंदणी करण्यासाठी सब-रजिस्ट्रारकडे अर्ज सादर केला. यावेळी त्यांनी अधिका-यांना निवेदन केले की, 'या अर्जाचे रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, जेणेकरुन संबंधित कागदपत्रं ते उत्तर प्रदेशातील बाल अधिकार संरक्षण आयोगाकडे पाठवतील.'
नियमांनी घातला खोडा
मात्र याप्रकरणात अधिका-याने सांगितले की, दत्तक प्रक्रियेचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी दोन्ही पक्ष (दत्तक देणारे आणि दत्तक घेणारे) उपस्थित असणं गजरेचे असते. दोघांच्या उपस्थितीतच रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते. म्हणून त्यांनी योगी यांच्या अर्जावर आक्षेप घेत त्यांना माघारी पाठवले. अधिका-याने असेही स्पष्ट केले की, दत्तक तेच देऊ शकतात, जे संबंधित व्यक्तीचे आई किंवा वडील आहेत. त्यांना आई-वडील असण्याचा पुरावाही सादर करावा लागतो.